ओटीटीचे आव्हान महत्त्वाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

सध्याचा जमाना हा ओटीटीचा आहे. या स्पर्धेत काही महिन्यांपूर्वी ‘ओटीटी झक्कास’ या नव्या चॅनेलची भर पडली आहे. सध्याच्या नव्या ट्रेंडविषयी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद…

अल्ट्रा झक्कास हा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म चालू करावा असे का वाटले?

– मुळात प्रादेशिक भाषेत जेव्हा एखादी मालिका, चित्रपट किंवा नाटक प्रसारित होते, तेव्हा लोकांना प्रादेशिक भाषेतील कार्यक्रम बघण्यात आपलेपणा वाटत असतो. मराठी भाषेविषयी प्रेम असणारे फक्त मराठीच नव्हे तर, अमराठी भाषिकही अनेक आहेत आणि त्यामुळे आपण मराठी भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माण करावा, असे उद्दिष्ट घेऊन या वर्षी गुढीपाडव्याला आम्ही या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली.

 कोणत्या आशयाचे कार्यक्रम सध्या प्रेक्षक तुमच्या ओटीटीवर पाहू शकतील?

– अल्ट्रा झक्कासवर मराठी नाटके, मराठी चित्रपट तसेच दाक्षिणात्य भाषेत निर्माण झालेले, पण मराठीत डबिंग केलेले आणि हॉलीवूडचेसुद्धा मराठी भाषेत डबिंग केलेले चित्रपट पाहता येऊ शकतात. आतापर्यंत दोनशे मराठी चित्रपट आमच्या
प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. जवळजवळ 75 मराठी नाटके आहेत. ‘फिल्मी कट्टा’ नावाचा एक तासाचा कार्यक्रम सुरू केलाय. तसेच फिल्म रीह्यू, क्राईम स्टोरीज, काही नवीन मराठी चित्रपटांची निर्मिती केलेय. ‘कुलस्वामिनी’ या आमची निर्मिती असलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद आहे.

या स्पर्धेत टिकून राहण्याविषयी काय सांगाल?

– स्पर्धा तर आहेच. आपण जर चांगले दिले, तर प्रेक्षक हे आपल्याकडे वळणारच. आमच्याकडे सध्या दोन हजार तासांपेक्षा जास्त तासांचा कन्टेंट उपलब्ध असून त्याचा आनंद प्रेक्षक घेऊ शकतात. तीन-चार स्वतंत्र मराठी चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शन तसेच काही वेब सीरिजसुद्धा करतोय.