भांडणात वृषणावर हल्ला करणं म्हणजे हत्येचा प्रयत्न नाही, कर्नाटक उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडणावेळी एखाद्या व्यक्तिच्या वृषणांना दाबण्याचा प्रयत्न हा हत्येच्या हेतूने केलेला आहे, असं म्हणता येणार नसल्याचं स्पष्टीकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने केलं आहे. या प्रकरणी आरोपीला झालेली सात वर्षांची कैदही कमी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार यांच्यात भांडण झालं होतं. त्या दरम्यान, आरोपीने तक्रारदाराच्या वृषणाला दाबण्याचा प्रयत्न केला होता. पीडित ओंकारप्पा याच्या तक्रारीनुसार, तो आणि अन्य काही जण गावच्या जत्रेत नरसिंहस्वामी यांच्या पालखीसमोर नाचत होते. त्याच वेळी आरोपी परमेश्वरप्पा तिथे मोटारसायकलवर तिथे आला आणि भांडू लागला. त्यानंतर झालेल्या भांडणात परमेश्वरप्पाने ओंकारप्पाचे वृषण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांच्या तपासानंतर परमेश्वरप्पाला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला सात वर्षांची शिक्षा झाली.

या प्रकरणी परमेश्वरप्पाने उच्च न्यायालयात दाद मागितली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नटराजन यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालय म्हणालं की, जरीही आरोपीने शरीराचा महत्त्वाचा भाग असलेल्या वृषणाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जो मृत्युचं कारण ठरू शकतो. या घटनेनंतर ओंकारप्पा याचे वृषण काढून टाकण्यात आले. तरीही आरोपी परमेश्वरप्पा याचा हेतू ओंकारप्पा याला ठार मारण्याचा होता, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे त्याच्याद्वारे केलेला हल्ला हा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवावरील हल्ला इतकाच ग्राह्य धरला जाऊ शकतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

जर आरोपीला हत्याच करायची असती तर त्याने त्याच्याजवळ एखादं घातक शस्त्र बाळगलं असतं, मात्र, तसं काहीही या प्रकरणात आढळून आलेलं नाही. मात्र, अशा प्रकारे हल्ला केल्यामुळे पीडिताला गंभीर नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे, या हल्ल्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता, असं म्हणून न्यायालयाने आरोपी परमेश्वरप्पा याची सात वर्षांची शिक्षा कमी करून तीन वर्षांची केली आहे.