
दृष्टिहीन विद्यार्थ्याला फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारणाऱया महाराष्ट्र राज्य व्यावसायिक थेरपी आणि फिजिओथेरपी परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. ज्या लोकांना मदतीची नितांत गरज असते, त्यांना मदत करण्याचे मार्ग शोधण्यासाठी एक समाज व सरकार म्हणून सामूहिक प्रयत्न असला पाहिजे. सरकारने गरजू लोकांना मदतीचा हात द्यावा, हात झटकू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला बजावत न्यायालयाने याचिकाकर्त्या दृष्टिहीन विद्यार्थ्याला फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परवानगी दिली.
40 टक्क्यांपर्यंत दृष्टिदोष असलेल्या झील जैन या विद्यार्थ्याला फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आला. राज्य फिजिओथेरपी परिषदेच्या या निर्णयाला विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. फिजिओथेरपी परिषदेने विद्यार्थ्याच्या याचिकेला विरोध केला. फिजिओथेरपीस्टना ऑपरेशन थिएटर, शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभागात काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर फिजिओथेरपीच्या अभ्यासक्रमामध्ये दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परवानगी देऊ शकत नाही, असा युक्तिवाद परिषदेतर्फे करण्यात आला. परिषदेच्या या दृष्टिकोनाचा खंडपीठाने चांगलाच समाचार घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. बहिष्काराचे आणखी मार्ग शोधणे हे परिषदेचे संवैधानिक कर्तव्य नाही, तर गरजू लोकांच्या मदतीसाठी वेगवेगळे मार्ग शोधणे व त्यासाठी सदैव प्रयत्नरत राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गरजू लोकांसाठी काही करू शकत नाही, असे सरकारने म्हणता कामा नये, असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्ता विद्यार्थी केवळ दृष्टिहीन आहे म्हणून त्याला फिजिओथेरपीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशापासून वंचित ठेवू नका, असे सरकारला बजावत खंडपीठाने विद्यार्थ्याचा फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
























































