विठ्ठल-रुक्मिणीच्या गजरात अवघी मुंबई दुमदुमली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या दिंडयांमुळे अवघी मुंबई विठ्ठल, रुक्मिणीच्या जयघोषाने दुणाणून गेली. दरम्यान, दिवसभर पावसाची संततधार सुरू असतानाही वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. यात छोटय़ा भक्तांपासून वृद्ध भक्तांचाही समावेश होता.

आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठूरायाला भेटण्याची ओढ आज लाखो वैष्णव भक्तांना लागली होती. पंढरपूरला लाखो भक्तांचा मळा फुलला असतानाही मुंबईतही विविध ठिकाणांवरून वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये दिंडय़ा पोहोचून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत होते. वडाळ्याचे विठ्ठल मंदिरही सकाळपासून भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे माऊलींचा पालखी सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, खजिनदार स्वप्नील झेमसे यांच्या उपस्थितीत पार पडला. दिलीप पाटील, उपाध्यक्ष राजेश कोकाटे, कार्यालयप्रमुख अभिजित भोसले व वारकरी बंधू उपस्थित होते.

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखा 222, माऊली प्रतिष्ठान व युवासेनेच्या वतीने बालाजी मंदिर फणसवाडी व महादेव शंकर शेठ लेन येथे तुळस व खिचडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी विभाप्रमुख पांडुरंग सकपाळ, उदय बने, सुनील देसाई, माऊली प्रतिष्ठान उपाध्यक्ष पल्लवी सकपाळ, करुणा गीध, प्रथमेश सकपाळ, नीलेश देवळेकर, अभिजित गुरव, माधुरी पेंढारी, दिलीप म्हात्रे आदी उपस्थित होते.

श्रमिक विद्यालयात वारकरी दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त जोगेश्वरी पूर्व येथील श्रमिक विद्यालयात वारकरी दिंडी काढण्यात आली. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी वारकरी बनून या दिंडीत सहभागी झाले. वर्गावर्गातून चाललेल्या हरिनामाच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

शाळेच्या संचालिका स्मिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत दरवर्षी हिंदुस्थानी संस्कृतीचा वसा जपला जातो. प्रत्येक सण शाळेत धूमधडाक्यात साजरा होतो. वर्गावर्गातून चाललेल्या हरिनामाच्या गजरामुळे वातावरमनिर्मिती झाली होती. समूह गायनाने विठुनामाच्या गजराचे कार्यक्रम झाले. विठ्ठल-रखुमाईची महाआरतीही यावेळी करण्यात आली. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीनल सरकाळे यांच्या नियोजनानुसार वारकरी संप्रदाय विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या रूपात गोळा झाला.

शाळेचे व्यवस्थापक अजित चव्हाण यांनी फेर धरून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम मोठय़ा जल्लोषात केला. रिंगण, फुगडय़ा, झिम्मा या सर्व प्रकारांमुळे श्रमिक विद्यालयात प्रतिपंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. शिक्षकही विद्यार्थ्यांसमवेत विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. निसर्गाचे भान ठेवून समाजप्रबोधनासाठी वृक्षदिंडीही आयोजित करण्यात आली. आपला प्रत्येक विद्यार्थी केवळ अभ्यासू नसावा, तर सर्व कलागुणात निपुण असावा, अष्टपैलू बनावा यासाठी त्याला नीतिमूल्यांची, संस्कारांची, संस्कृतीची जाण असावी यासाठी संचालिका स्मिता चव्हाण शाळेत अनेक सण साजरे करतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा पहिला ‘आषाढी एकादशी’चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

वरळीत शाळकरी मुलांनी श्री विठ्ठल–रखुमाई यांची पालखीतून दिंडी काढली. यात बालविकास मराठी शाळा, जनता हायस्कूल, वरळी कोळीवाडा येथील सुमारे 300 मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी युवासेनेच्यावतीने मुलांना तुळशीच्या रोपटयाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक शिर्पे आणि शिक्षक, युवासेना सहसचिव राजीव लाड, युवासेना समन्वयक संतोष सरोदे, नेहा वर्मा, संकेत वरळीकर, स्नेहल देशमुख, जयराज जोशी, ऐश्वर्या भिलारे, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 77 मध्ये माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीनिमित्त भजन, दिंडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रहिवाशांना तुळशी रोपवाटप करण्यात आले. यावेळी महिला विधानसभा संघटक रचना सावंत, प्रियंका आंबोळकर, प्रियंका आंधळे शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, महिला शाखा संघटक शैलजा नरवणकर, समन्वयक उदय हेगिष्टे यांचे सहकार्य लाभले.