
>>श्रीपाद पु. कुलकर्णी
रविवार असल्याने जरा उशिराच उठलेला राजू दातांवर ब्रश फिरवत फिरवत बैठकीच्या खोलीपुढे पसरलेल्या प्रशस्त गच्चीवर जाण्यासाठी दारात येऊन उभा राहिला. “पुरे झालं दात घासणं… चूळ भर तीनचारदा आणि तुझ्या आवडीचा बोर्नव्हिटा प्यायला ये…” चूळ भरून झाल्यावर आळसावलेल्या आवाजात राजूने पार केली, “आई, ते कबुतर कसं स्वतभोवती गिरक्या घेत आवाज काढत होतं ते मी बघत होतो ना!”
“तू दूध घे आणि बघत बस त्याच्याकडे हवं तेवढं. ते कबुतर असतं लोचट अन् घाण करतं आपली गच्ची. त्याचं कसलं कौतुक सांगतोस मला!” असं बोलून आईनं राजूला खुर्चीत बसवून टेबलावर दूध-बिस्किटं ठेवली.
दूध घेऊन झाल्या झाल्या राजूने धाव घेतली गच्चीच्या दरवाजात. कबुतर नव्हतंच तिथे. ते समोरच्या झाडावर जाऊन बसलं होतं चोचीने पंख साफ करत. पण हे काय, हा कावळा कसा येऊन बसला आज गच्चीवर. “आज आपल्याकडे कुणीतरी पाहुणे येणार वाटतं. कावळा येऊन बसलाय म्हणजे… असं आजी म्हणते बुवा!” मागे येऊन उभा राहिलेला नंदूदादा बोलला तसा “आई, आपल्याकडे आज कुणीतरी पाहुणे येणार का?” असं ओरडत पळत राजू आत स्वयंपाकघराकडे धावला अन् गच्चीवर कावळा आल्याचं त्यानं सांगितलं.
एखादं मोठ्ठं काम झाल्यासारखा राजू परत गच्चीच्या दारात धावत जाऊन उभा राहिला. पण आता फक्त कावळा नव्हता तिथे. त्याच्या दोन बाजूला दोन छोटे छोटे पक्षी होते. अगदी चिमणीसारखे दिसत होते. डोकं काळं, चोच, अंग राखाडी… फक्त मागचे शेपटाकडचे पंख पसरलेले होते जपानी कागदी पंख्यासारखे. ते पक्षी एका जागी न बसता कावळय़ाभोवती नाच करत होते. राजूने आईला हाकांचा सपाटा लावून ते बघायला बोलावलंच. “अरे, हा तर नाचरा पक्षी. त्याचं खाद्य म्हणजे घोंघावणाऱया माश्या आणि उडणारे छोटे कीटक. त्याला ‘फॅन-टेल फ्लायकॅचर’ असं इंग्रजीत म्हणतात.”
आता त्या पक्ष्यांनी कावळ्याला चोच मारून भंडावून सोडलं होतं. तेवढय़ात नंदूदादा चित्कारला, “अरे बापरे, त्या कावळ्याच्या पंजात आहे काहीतरी, जे त्या पक्ष्यांना हवंय.” नंदूदादा. तेवढय़ात कावळा आणि ते पक्षी घाबरून तिथून उडाले. “अगं आई, हे बघ काय टाकलंय कावळ्याने.” आईने नीट बघितलं आणि कळवळून उद्गारली, “अरे, ते त्या नाचऱया पक्ष्यांचं पिलू दिसतंय. कावळ्याने ते पायांमध्ये धरलं होतं”
दादाने ते पिल्लू अलगद उचलून आणलं. राजूने एका भांडय़ात पाणी आणलं. आईने एक स्वच्छ फडकं, निर्जंतुकीकरणाचं औषध, कापूस आणून त्या पिल्लाला मलमपट्टी केली. कापसाची गादी करून त्यावर ठेवलं. राजूने आणलेलं पाणी पाजलं. तळहातावर मावेल असं ते पिलू, जरा हुशारी वाटून डुलुडुलु हालचाल करू लागलं तेव्हा कुठे सगळ्यांच्या चेहऱयावर समाधानाचं हसू आलं.
आई म्हणाली, “ते समोरच्या मोठय़ा झाडावर कुंडीच्या आकाराचं वेताच्या टोपलीसारखं घरटं दिसतंय ना, तिथूनच पळवलं असणार हे पिल्लू त्या दुष्ट कावळ्याने. म्हणूनच याचे आई-बाबा त्या कावळ्याला सतावून या पिल्लाची सुटका करू पाहत होते.”
पशुपक्षी, आपण सारेच आपापल्या आई-बाबांच्या पंखांखाली सुरक्षित राहू शकतो या जाणिवेने नंदूदादा आणि राजूने पिल्लू बरं झालं की, त्याला त्याच्या आईबाबांच्या हवाली करायचं ठरवूनच टाकलं.




























































