
‘नटसम्राट’मधील नायकाची घरासाठी होत असलेली परवड व आयुष्याची दशा ‘घर देता का कोणी घर’ या संवादातून जगासमोर आली. मात्र, माळशिरस येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी समाजबांधवांना कुणी ‘स्मशान देता का स्मशान’ अशी हाक देत मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी राहत्या गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क दुसरं गाव शोधावं लागले.
माळशिरस येथील पैलवान कुटुंबातील शारदाबाई शिकाप्पा पैलवान (वय 94) यांचे वृद्धापकाळाने माळशिरस येथे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी चक्क 15 किलोमीटर अंतर असलेल्या अकलूज शहरातील स्मशानभूमीकडे जावे लागले, यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची मागणी करणाऱया नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले. यासाठी नियोजित केलेल्या जागेवर सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प बसवल्याने स्मशानभूमीसाठी जागा नाही. यापूर्वी अनेक निकडणुकांमध्ये वेगवेगळ्या गट व पक्षाच्या नेत्यांनी समाजाला स्मशानभूमीचे आश्वासन दिली होते. मात्र, अद्यापि त्याची पूर्तता झाली नाही, त्यामुळे समाजबांधवांना मृत्यूनंतरही इथे संघर्ष करावा लागत आहे.
समाजबांधवांनी यापूर्वी अनेक वेळा याबाबतीत पाठपुरावा केला आहे. मात्र, स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही. यापुढील काळात मयत झाल्यास तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असा इशारा लिंगायत समाजाच्या वतीने दिला आहे.
























































