अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरण, रमेश कदम यांना पाच गुन्ह्यांत जामीन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कथित घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने घोटाळ्याशी संबंधित पाच गुह्यांत कदम यांना प्रत्येकी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र सोलापूर आणि भंडारा येथील दोन गुन्ह्यांत जामीन मिळणे बाकी असल्यामुळे सध्यातरी कदम यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. सोलापूरच्या गुह्यातील जामीन अर्जावर 12 जुलैला सुनावणी होणार आहे.

312 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मुख्य गुह्यात रमेश कदम यांना मार्चमध्ये उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. कदम यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून तसेच बनावट कागदपत्रे बनवून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोटयवधींच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. राज्य सरकारने 2012 मध्ये महामंडळाच्या अध्यक्षपदी कदम यांची नियुक्ती केली होती. घोटाळ्याप्रकरणी सुरुवातीला 2015 मध्ये दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इतर पाच जिह्यांत वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले. याप्रकरणाचा तपास नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. कदम हे मागील आठ वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी पाच जिह्यांमध्ये दाखल असलेल्या गुह्यांत ऍड. प्रशांत राऊळ यांच्यामार्फत विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. त्यावर सुनावणी पूर्ण होऊन राखून ठेवलेला निर्णय न्यायाधीश राहुल रोकडे यांनी शुक्रवारी जाहीर केला. न्यायालयाने संबंधित पाच गुह्यांमध्ये प्रत्येकी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करीत रमेश कदम यांना मोठा दिलासा दिला.