
>> संजय कुळकर्णी
प्रत्येक वाहिनीचे लक्ष हे मालिकांच्या टीआरपीकडे असते. टीआरपीवरून वाहिनीला जाहिराती मिळतात. त्या पैशावर वाहिनीचे अर्थकारण हे बनले जाते. मालिकेचा टीआरपी चांगला असेल तर ती मालिका वर्ष-वर्ष तग धरून असते. तो खाली आला की, मालिकांच्या निर्मात्यांना घाम फुटतो. कारण वाहिनी कधी मालिका गुंडाळायला सांगतील याचा नेम नसतो.
प्रत्येक वेळी मालिकांमध्ये टीआरपी क्रमांकात स्पर्धा असते. ते स्पर्धात्मक गणित असल्यामुळे मालिकांचा दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक त्यावर लक्ष केंद्रित करतो. जर मालिकांचा क्रम खाली आला तर त्या मालिकांची टीम कथानकात बदल करून पुन्हा ट्रकवर येण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान प्रेक्षकांना जखडून ठेवणारी मालिका कंटाळवाणी झालेली असते. निर्मात्यांना, वाहिनी प्रमुखांना प्रेक्षकांचे काहीही सोयरसुतक नसते. त्यांचे लक्ष फक्त अर्थकारणाकडे असते.
‘आई कुठे काय करते’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या दोन मालिकेत स्पर्धा होताना दिसली. त्यानंतर ‘ठरलं तर मग’ या मालिकेने लोकप्रियता संपादन केली. तीही मालिका स्पर्धा करू लागली. ‘ठिपक्यांची रांगोळी’सुद्धा कळत-नकळत स्पर्धा करताना दिसली. गेल्या सहा महिन्यांपासून ‘ठरलं तर मग’ नंबर वनवर होती. पण आता चित्र वेगळे आहे. पुन्हा नंबर वनवर ‘रंग माझा वेगळा’ आहे. कारण एकच ते हे की, ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे गेल्या आठवडय़ातील काही भाग फारच बालिश प्रेक्षकांना वाटले. त्यामुळेच ही मालिका नंबर वनवरून टीआरपीमध्ये घसरली. या मालिकेचे नंबर वन पद गेले. हे केवळ बालिश भागांमुळे झाले हे प्रेक्षकसुद्धा जाणतात. खरं म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजेसासू तिच्या नातसुनेला छळेल पण अती नाही. त्यात तर पूर्णाआजी सतत सायलीला टोमणे मारत छळतानाच दिसली आहे. त्यामुळे आपण ‘माहेरची साडी पार्ट 2’ पाहत आहोत की काय, असे वाटते. तसेच अस्मिताचे वास्तव्य पूर्णाआजीकडे असल्यामुळे तेसुद्धा मनाला न पटणारे आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेबद्दल तेच म्हणता येईल. काही भाग चोरी करतानाचे दाखविले, त्यात बालिशपणा हा फारच होता. असे का होते ते कळायला मार्ग नसतो. पटकथाकाराची ती कल्पनाशक्ती असते असे सऱहासपणे बोलले जाते. कलाकारसुद्धा आतल्या आत तेच म्हणत असतील, पण ते सांगू शकत नाहीत. जर तसे स्पष्ट बोलल्यावर त्या त्या व्यक्तिरेखांचा त्यांचा ट्रक बदलण्याची त्यांना भीती असते. मानधनाच्या जाड पाकिटावर गदा यायची म्हणून अळीमिळी गुपचिळी हे धोरण ते अवलंबवतात. हे बहुतांशी सर्व वाहिनींच्या मालिकेतून दिसते.
याउलट संत महात्म्याच्या आणि देवांच्या मालिका या प्रेक्षक आवडीने पाहताना दिसलेत. लहान मुलांच्या सांगीतिक स्पर्धा मात्र प्रेक्षक पाहताना दिसतात. हेच कार्यक्रम वाहिनीवाल्यांनी सोमवार ते रविवार दाखवावेत. तसेच काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘आभाळमाया’, ‘गंगाधर टिपरे’, ‘वादळवाट’, ‘गोटय़ा’ इत्यादी मालिकांचे प्रसारण पुन्हा करावे, पण हे वाहिनीवाल्यांनी मनावर घेतले तरच? प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की, आम्ही वाहिनीवर काय पाहायचे? नाटकवाले जसे प्रेक्षकांना ‘मायबाप प्रेक्षक’ म्हणतात तसे वाहिनीवाले समजत नसावेत असे प्रेक्षकांना वाटू लागलेय. म्हणून म्हणावसे वाटते की, ‘‘बाबांनो प्रेक्षकांचा अंत पाहू नका…’’

























































