ठसा – डॉ. मो. स. गोसावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा सदावर्ते

मूल्याधारित शिक्षणात राष्ट्रनिर्मितीची ताकद आहे, या विचारासाठी एका ज्ञानतपस्वीने आयुष्य वाहून घेतले होते, ते म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महासंचालक डॉ. मो. स. गोसावी. नाशिक या कर्मभूमीतून सहा दशकांहून अधिक काळ देशाला आपल्या द्रष्टेपणाने दिशा दिली. 55 वर्षांपूर्वी व्यवस्थापन शास्त्र्ााचा पाया रचला. शिक्षण क्षेत्राला संशोधन, अध्यात्म, तत्त्वज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून व्यासंगी समाज, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य दिले. त्यांचे 9 जुलै रोजी निधन झाले. एक ध्यासपर्व कृतीशीलतेसह समृद्ध शिक्षण व्यवस्थेची जगाला देणगी देऊन अस्ताला गेले आहे.

संत एकनाथ महाराज यांच्या कन्येच्या वंशातील वेदशास्त्र्ासंपन्न कुटुंबात फलटणमध्ये 15 सप्टेंबर 1935 ला मोरेश्वर सदाशिव गोसावी यांचा जन्म झाला. श्रीमंत मालोजीराजे यांना वयाच्या तिसऱया वर्षी अस्खलितपणे अथर्वशीर्ष ऐकवले, विलक्षण बुद्धिमत्तेने जगाला थक्क करण्याची ती सुरुवात ठरली. वडिलांनी तीन इयत्तांचा अभ्यास करून घेतल्याने थेट मराठी चौथीची परीक्षा देत पहिला क्रमांक मिळवला. सहाव्या वर्षी इंग्रजी पहिल्या इयत्तेत दाखल झाले आणि चौदाव्या वर्षी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन एकापाठोपाठ एक विक्रम प्रस्थापित केले. बी. कॉमला 80 टक्के गुणांसह प्रथम श्रेणीत आशिया खंडातील प्रथम क्रमांक मिळवणारे ते पहिले विद्यार्थी ठरले. या यशाचे उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांना मोठे कौतुक वाटले, त्यांनी शाबासकी दिली. त्यांच्यासह जेआरडी टाटा या दोन द्रष्टय़ा उद्योजकांचे मार्गदर्शन व्यवस्थापन शास्त्राचा पाया रचण्यासाठी गोसावी सरांना प्रेरणा देणारे हेते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून तज्ञांशी चर्चा करीत 1967 ला नाशिकच्या बीवायके महाविद्यालयातच देशात विद्यापीठ स्तरावर प्रथम एमबीएची सुरुवात झाली. देशाच्या प्रगतीसाठी ज्ञानाइतकेच व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सिद्ध करून दिले, हे योगदान कधीही न विसरता येणारे आहे. व्यवस्थापन शास्त्र्ाात पीएच. डी प्राप्त करणारे ते पहिले हिंदुस्थानी आहेत.

प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांनी त्यांच्यावर वयाच्या 23 व्या वर्षीच गोखले एज्युकेशन सोसायटीतील बीवायकेच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपवली, ते 37 वर्षे प्राचार्य होते. सर्वात कमी वयात आणि प्रदीर्घ काळ प्राचार्यपद भूषवण्याचा हा जागतिक विक्रम आहे. त्याआधी 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा राज्यपालांनी नाशिकमध्ये येऊन त्यांचा गौरव केला. आयएएसमध्ये यश मिळवूनही शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देणारे ते महर्षी होते. सन 1973 पासून सचिव म्हणून काम पाहत दर्जेदार शिक्षणासाठी संस्थेची देशपातळीवर ओळख निर्माण केली. आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी तळमळीने काम केले. कृषी, उद्योजकता विकासाचे महत्त्व मांडले. पाठपद्धतीपेक्षाही संवादरूपी शिक्षणाभर भर दिला. त्यांचे संशोधनपर लेखन, पुस्तके हा सर्वांसाठी ठेवा आहे.

प्रचंड बुद्धिमत्ता, विनयशीलता, वक्तशीरपणा हे गुण प्रभावित करणारे होते. स्त्री सक्षमीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रथम महिलांसाठी बहिस्थ महाविद्यालय उघडले. त्यानंतर एसएमआरके महिला महाविद्यालय उभारून नवनव्या अभ्यासक्रमांचे दालन खुले केले. शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी युनोने त्यांना ‘टिचर ऑफ द मिलेनियम’ किताब दिला. मुंबईच्या नगरपालांनी ‘सर’ उपाधी बहाल केली. देशपातळीवरील वाणिज्य, व्यवस्थापन व तंत्रज्ञानविषयक संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम केले. संस्कृत भाषा, अध्यात्माची आवड कायम जपली. शिक्षणाला अध्यात्माशी जोडत पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून याकरिता योगदान दिले. त्यांचे 88 वर्षांचे आयुष्य म्हणजे एक तपस्या होती, ज्ञानाची प्रतिष्ठा आणि शुद्धता जपण्याची.