कोरियोग्राफी अन् मॉडेलिंग क्षेत्रातील ‘भूषण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज

अंगात उत्तम कला आणि जोडीला मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. वेळोवेळी अनेक कलाकारांनी हे सिद्धसुद्धा करून दाखवलं आहे. असाच एक कलावंत म्हणजे डोंबिवलीचा भूषण मालंडकर. उत्कृष्ट कोरियोग्राफर ही भूषणची ओळख. कॉलेजमध्ये असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत त्याच्यात नृत्याची आवड निर्माण झाली. कॉलेजपासून जोपासलेल्या नृत्याच्या आवडीचे रूपांतर त्याने करीअरमध्ये केले. नृत्याच्या क्लासला न जाता त्याने ही कला आत्मसात केली. त्यानंतर हळूहळू तो मॉडेलिंगकडे वळू लागला. अनेक कॉलेजमधून विद्यार्थ्यांना नृत्य, मॉडेलिंग शिकवण्यासाठी त्याला बोलावले जाऊ लागले. आज नृत्यासह मॉडेलिंग क्षेत्रात तो दिग्दर्शन करत आहे.

भूषणने अनेक आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग इव्हेंटमध्ये सहभाग घेतला आहे. त्याने फॅशन शो संचालन आणि फॅशन कोरिओग्राफर म्हणून 500 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शो केलेत. त्यापैकी जुलै 2016 मधील दुबई आणि यूएई फॅशन शो कार्यक्रमात भूषणने दिलेले योगदान फारच मोलाचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडसाठीही त्याने फॅशन शोचे संचालन, नृत्यदिग्दर्शन आणि संपूर्ण इव्हेंटचे काम केले. इतकंच नव्हे, 2017 मध्ये एनआयआयएफडी इन्स्टिटय़ूटसाठी फॅशन शोचे नृत्यदिग्दर्शन केले. आज कोरियोग्राफी आणि मॉडेलिंग क्षेत्रात भूषणचे नाव फार मोठे आहे. हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नक्कीच नव्हता. या प्रवासात त्याच्या पत्नीने तेजस्वीने खंबीरपणे साथ दिली.