
मंदिरांचा उद्देश हा तेथे प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्त आणि भाविकांसाठी शांतता तसंच आनंदासाठी असणं अपेक्षित आहे. पण, दुर्दैवाने मंदिरांच्या उत्सवांमध्ये हिंसाचार होताना दिसत आहे. त्यामुळे हिंसाचार रोखण्यासाठी अशी मंदिरं बंद करणं योग्य ठरेल, असे खडेबोल मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. एका सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनेक मंदिरांमध्ये साजरे केले जाणारे उत्सव त्या भागात कोण जास्त शक्तिशाली आहे, हे दाखवण्याचं माध्यम झाले आहेत अशा शब्दांत फटकारलं आहे.
एका व्यक्तीने आपण मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त असल्याचा दावा करत दरवर्षी होणाऱ्या मंदिर उत्सवाच्या आयोजनासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, चेन्नई राज्य सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हा मंदिर उत्सव कुणी करायचा यावरून दोन गटात वाद सुरू आहे. हा वाद सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर तहसिलदारांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही. अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं.
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांच्या खंडपीठाने अशा मंदिर उत्सवांचा शेवट दोन गटांमधील हिंसाचारात होतो. मंदिरांचा उद्देश भाविकांना शांतता आणि आनंदासाठी देवाची भक्ती करणे हा आहे. मात्र, दुर्दैवाने मंदिर उत्सवात हिंसाचार होत आहे. हे उत्सव त्या भागात कोण अधिक शक्तीशाली आहे हे दाखवण्याचा मंच झाले आहेत. हे उत्सव आयोजन करण्यात कोठेही भक्ती दिसत नाही. यामुळे मंदिर उत्सवांच्या मूळ हेतूचाच पराभव होत आहे, असं निरीक्षण नोंदवलं आहे. तसेच यापेक्षा असे हिंसाचार रोखण्यासाठी अशी मंदिरं बंद करणं योग्य ठरेल, असंही खंडपीठाने यावेळी नमूद केलं.

























































