
>>संजीव साबडे
भाजलेल्या वा तळलेल्या पापडावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि वरून विविध चटण्या, चाट मसाला हे दृश्य आता नवं राहिलेलं नाही. विविध खाऊ गल्ल्यांमध्ये अनेक जण सकाळ, दुपार वा संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी उभं राहून मसाला व खिचिया पापड खात असतात. गेल्या काही वर्षांत मसाला पापड व त्यातही खिचिया पापड भलताच लोकप्रिय झाला आहे.
मुंबईसारख्या बहुरंगी, बहुढंगी खाद्यसंस्कृती असलेल्या मायानगरीत लोकांना काय आवडेल आणि रस्त्यांवर उभं राहून कोण काय खाताना दिसेल हे सांगता येत नाही. पावभाजी आणि वडापाव हे उत्तम प्रकार जोरात चालत असताना दाबेली हा आंबटगोड वेगळा प्रकारही लोक रस्त्यांवर उभं राहून खातात. उपवासाची खिचडीही रस्त्यावर विकत घेतात. तसंच घरात जेवणात खायचा पापड रस्त्यांवरील फेरीवाल्यांकडून विकत घेतात. भाजलेल्या वा तळलेल्या पापडावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि वरून विविध चटण्या, चाट मसाला हे दृश्य आता नवं राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांत मसाला पापड व त्यातही खिचिया पापड भलताच लोकप्रिय झाला आहे.
पूर्वी जेवणात भाताबरोबर पापड, पापडय़ा, कुरडया हे तळलेले प्रकार असत. पापड कधी शेगडीवर वा तव्यावर भाजलेला असायचा. उन्हाळ्यात अनेक घरी पोहे, उडीद डाळ, नाचणी, चना डाळ, बटाटे, साबुदाणा, तांदूळ यापासून पापड, कुरडया बनवण्याचा मोठाच कार्पाम असे. अनेक घरांत शेवया, सांडगे, गहुले, पापडय़ाही बनवल्या जात. पण हळूहळू घरी पापड बनवणं कमी झालं आणि तयार पापड घरी आणणं सुरू झालं. बऱयाच घरांत जेवणाच्या ताटातून पापड गायब होऊ लागला. त्याऐवजी घराबाहेर रेस्टॉरंटमध्ये स्नॅक्स म्हणून पापड खाणं सुरू झालं. मग भाजलेल्या वा तळलेल्या त्यावर पापडावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर त्यावर तिखट-मीठ पसरून तो मसाला पापड म्हणून हजर झाला. कोणत्याही कुरकुरीत खाद्यपदार्थावर कांदा, टोमॅटो घातला की तो लोकांना आवडतो हे लक्षात आल्यावर कडक रोटीवरही असं घालून गिऱ्हाईकांना दिलं जाऊ लागलं.
पण आता तर प्रत्येक खाऊ गल्लीत साधा पापड, मसाला पापड व खिचिया मसाला पापड मिळू लागला आहे. फार पूर्वी, सुमारे 32/35 वर्षांपूर्वी बोरीबंदरच्या खाऊ गल्लीत झुणका भाकर केंद्र व कॅनन भाजीपाव स्टॉलपाशी अचानक एक माणूस दिसू लागला. त्याच्या प्लास्टिकच्या पिशवीत पापड असायचे, एका भांडय़ात हिरवी ठेचेवजा चटणी व सोबत शेगडी असायची. शेगडीवर तो खिचिया वा खिचू म्हणजे तांदळाचा पातळ पापड भाजायचा आणि त्यावर एका बाजूला चटणी ठेवून विकायचा. सुरुवातीला त्याला गिऱहाईकं मिळत नव्हती, पण नंतर धंदा वाढू लागला. पातळ खिचिया पापड लोकांना आवडू लागला. कधी कधी त्याच्याकडे तळलेले खिचिया पापडही असायचे. काळबादेवी, झवेरी बाजार, भुलेश्वर, घाटकोपर, मुलुंड, मालाड, कांदिवली, बोरिवली येथेही याच काळात खिचिया पापड विकणारे बहुतांशी राजस्थानी व काही गुजराती लोक दिसू लागले.
मराठी घरांतही तांदळाचा पापड बनतो आणि खाल्लाही जातो. अनेकांच्या जेवणात तांदळाचा वा उडदाचा पापड असतोच. त्यामुळे त्यात नवं काय, असं अनेकाना वाटतं. पण रस्त्यांवर वा खाऊगल्ल्यांत तो असा सजवतात की खाण्याचा मोह आवरत नाही. कोणत्याही खाऊ गल्लीत खिचिया पापड विकणारे एक-दोनजण असतातच. काहींना त्यावर पसरलेले भारंभार पदार्थ आवडत नाहीत. असे लोक मग केवळ पापड व चटणी खाताना दिसतात. पूर्वी छोटय़ाशा दगडी कोळशाची शेगडीवर भाजला जाणारा हा पापड गेल्या चाळीस वर्षांत इतका लोकप्रिय झाला की आता हा व्यवसाय मोठय़ा हातगाडीवर वा दुकानात केला जातोय. गुजराती व राजस्थानी ज्या भागांत राहतात वा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी वा तेथील खाऊ गल्लीत हा पापड मोठय़ा प्रमाणात विकला जातो.
केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक वा अगदी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत रस्त्यावर असा पापड विकणारे, खाणारे क्वचितच दिसतील. पण आता उत्तरेच्या अनेक राज्यांत व मुंबईच्या खाऊगल्ल्यांत खिचिया पापड राजेशाही थाटात वावरताना दिसतो.
मुंबईतील खाऊगल्ल्यांत आपलंही अनेकदा येणं जाणं होत असतं. रस्त्यावर पापड खात उभं राहणं आवडत नसेल तर एखाद्या वेळेस तो तिथे खाल्ला तरच खिचिया मसाला पापड खाण्याची मजा लक्षात येईल. हिरवी वा लाल मिरचीच्या चटणीऐवजी शेझवान
सॉस किंवा काही ठिकाणी तर खजूर-चिंचेची चटणीही पापडवाले ठेवतात. एकूणच गेल्या काही काळात मूळ पदार्थाऐवजी टॉपिंगलाच महत्त्व आलं आहे.
काळबादेवी, झवेरी बाजारच्या तिसऱया अग्यारी लेनच्या खाऊ गल्लीतील अजय मसाला पापड एकदम भारी. तिथे मसाला पापड तर मिळतोच, पण साधा भाजलेला वा तळलेला खिचिया पापड व सोबत शेजवान किंवा अन्य चटणीही मिळते. काळबादेवीच्याच चिप्पी चाळीत ‘राजस्थान का प्रसिद्ध मसाला खिचिया पापड’ नावाचं दुकान आहे. तिथे असंख्य प्रकारचे पापड मिळतात. चर्चगेटच्या ाढा@स मैदानाजवळील खिचिया पापडवाल्याकडेही बरीच गर्दी असते. भुलेश्वरच्या खाऊ गल्लीतील मसाला पापड फेमस आहे आणि चर्नीरोडच्या पूर्वेला हिंदुजा कॉलेजजवळील खिचिया पापड खाण्यासाठी अनेक तरुण उभे असतात. गिरगाव चौपाटीवर फक्त संध्याकाळी हा पापड मिळतो. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बऱयाचदा एक पोता खिचिया पापड विकत असतो. दादर स्टेशनच्या पूर्वेलाही खिचिया पापड मिळू लागला आहे.
वांद्रय़ाच्या कार्टर रोडवरील खाऊ गल्लीतही मसाला पापड मिळतो. अनेक महिला, तरुणीचं ते खरेदीसाठी आवडीचं ठिकाण आहे. शिवाय लिंकिंग रोडवर नॅशनल कॉलेज परिसरातही या पापडांना खूप मागणी दिसते. तिथे व अनेक कॉलेजच्या परिसरात हे मसाला पापड खाणं आता स्टाइल बनली आहे. अपमार्केट ठरलं आहे. जुहूच्या इर्ला मार्केट गल्लीत आणि चौपाटीवरही खिचिया मसाला मिळतो. अंधेरी पूर्वेला एमव्ही अँड एलयू कॉलेज, पश्चिमेला भवन्सपाशी आणि संध्याकाळी कधी तरी चार बंगला मार्केटमध्ये पापड खाणारे दिसत राहतात. मालाड स्टेशनजवळील नटराज मार्केट आणि लिंक रोडवरील माईंड स्पेस परिसर येथे दोन-तीन ठिकाणी मसाला खिचिया पापड मिळतो. कांदिवली पश्चिमेच्या महावीर नगरातही उत्तम मसाला पापड मिळतो. बोरिवली पूर्वेला व पश्चिमेला पापड खाणारे पाहिले की आपण योग्य ठिकाणी आल्याचं समजतं.
पूर्व उपनगरात घाटकोपर व मुलुंड भागातल्या खाऊ गल्ल्या खादाडीसाठी खूपच प्रसिद्ध. घाटकोपरची गल्ली विविध डोशांसाठी प्रसिद्ध असली तरी तिथल्या पापड स्टॉलपाशीही लोकांची गर्दी दिसते. अनेक जण पापडापासून सुरुवात करून पुढील पदार्थांकडे वळतात. घाटकोपर पूर्वेच्या वल्लभ बाग लेन परिसरातही आहे. मुलुंडला कालिदास नाटय़गृहाजवळची खाऊ गल्लीही खाद्यप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. इतर ठिकाणांप्रमाणे इथेही कांदा, टोमॅटो, काकडी, चटणी, शेव यांचं टॉपिंग असलेला मसाला पापड 30 रुपयांत मिळतो. टॉपिंगमध्ये चीज असेल तर त्या प्रमाणात रेट वाढतो. काहींना तर मसाला पापडावर पनीरचे बारीक तुकडेही लागतात. काही ठिकाणी अमूल बटरचा पापड असतो. काही त्यावर मसाला म्हणून बटाटा भाजी हवी असं सांगतात. जेवणात कढी भात वा खिचडीबरोबर खायच्या पापडाचे नखरे मूळ जेवणापेक्षा वाढत चालले आहेत.
चेंबूरमध्ये पंजाबी, गुजराती लोक राहतात आणि तिथे फार जुनी सिंधी कॉलनीही आहे. अशा ठिकाणी विविध प्रकारचे मसाला पापड हमखास मिळतात. इथली खाऊ गल्ली सिंधी कॅम्प परिसरात आहे जिथे मसाला पापडाबरोबर सिंधी पद्धतीचं जेवणही मिळतं. तेथील झामा नावाची मिठाईही अतिशय लोकप्रिय आहे. विविध भागातील मुंबईकर इथून झामा घेऊन जातात. तिथे पापड खा, दाल पकवान खा, खिचडी खा, कढी पकोडा खा. खायची इच्छा नसली तरी झामा मात्र खा आणि घरीही घेऊन जा.
– [email protected]





























































