
>> सुहास मळेकर
‘‘उसको कहा ना, हमारी दोस्ती खतम.’’
त्याच्या मित्राने त्याला तिसऱ्याकडून पाठविलेला संदेश सांगताना तो खूप भावुक झालेला. काय झाले होते त्याला कळायला मार्ग नाही. त्या मेसेज देणाऱया तिऱहाईतालाही माहीत नाही. तो संपर्क करूनही संपर्कात येत नव्हता.
दोन मित्रांची गोष्ट होती बहुधा. एक निखळ मैत्रीत गुरफटलेला, तर दुसऱयाने विचारपूर्वक कदाचित हेतुपूर्वक मैत्री केलेली असावी. माझ्यासाठी अपरिचित असलेल्या त्याच्या त्या मित्राने दूर ढकलल्यावर हा मुलगा माझ्याकडे त्याचे मन मोकळे करायला आला होता. सगळे ऐकून घेतल्यावर त्याला म्हटले, ‘‘अरे अशी मैत्री नसते. तू जिवापाड मैत्री केलेली दिसतेय आणि त्याला पर्वा नाही तुझी. त्याने कारण सांगायला हवे होते.’’
त्याला समजावताना कोणीतरी कुठेतरी इतिहासात लिहून ठेवलेले आठवले. ‘’प्रेम केले आहेस ना? जाऊ दे, मोकळे सोडून दे. आलेच परत तर ते तुझे, नाहीतर ते तुझ्या आयुष्यात कधी आलेच नव्हते असे समज.’’
प्रेमासाठी कुणीतरी लिहिलेले हे सुभाषित मैत्रीलाही लागू होते. त्याला हे सांगितल्यावर तो सावरलेला दिसला. मैत्रीची गाठ कुठेही, कशीही बसू शकते. तेव्हा खरे तर ’दोन ध्रृवांवरचे दोघे आपण’ असे समजून मैत्री पुढे न्यायची ठरवली तर सगळे सोपे होते. अपेक्षा राहत नाहीत, त्याचे काही चुकले तरी राग येत नाही, तो आपल्यासारखा, आपल्या विचाराने वागू शकत नाही हे मनाशी पक्के ठरवता येते. त्याच्या आचार-विचारांचा आदर केला तर तोही तसाच रिफ्लेक्ट होतो आणि मैत्री कायम राहते.
मैत्री झाल्यानंतर त्या मैत्रीला गुण-अवगुणांसह स्वीकारणे महत्त्वाचे असते. एकदा मैत्री स्वीकारलीत तर तुम्हाला त्याला जपता आले पाहिजे. एकमेकांचे चुकत असेल तर परस्परांना स्पष्ट सांगता आले पाहिजे. मित्र-मैत्रीण कोणीही असो, एकदा मैत्री स्वीकारली की, दोघांत स्पष्ट संवाद होणे महत्त्वाचे आहे.
‘‘तू तुझ्या जागी योग्य आहेस, त्याच्या खूप अपेक्षा असतील तुझ्याकडून.’’ तो आता खूप शांत झालेला. त्या दोघांमध्ये काय झाले असेल विचार करत होतो. शेवटी या चांगल्या मैत्रीत कोणीतरी गैरसमज करून देणारा आला असावा या विचारापर्यंत पोहोचलो. तिसऱयाने कान फुंकले की, मैत्री तोडणारी माणसे हलक्या कानाची असतात. मैत्रीसाठी आसुसलेल्या त्या मुलाचे खूप वाईट वाटले.
मैत्री अशी अर्धवट नसावी. मैत्री झालेली व्यक्ती मग ती विचारमंद, अहंकारी, हेकेखोर, सुरूप-कुरूप, काळी-गोरी, लुळीपांगळी, आंधळी कशीही असो. ‘’असू दे कसाही, तो माझा मित्र आहे’’ असे अभिमानाने सांगता आले पाहिजे. तो अपरिचित मैत्रीसाठी तिथे कमी पडला.

























































