‘सुळकुड’साठी इचलकरंजीत पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिण्याच्या पाण्यासाठी सुळकुड पाणी योजना करावी, या मागणीसाठी इचलकरंजीकरांकडून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. शहरातील सांगली रोडवर हजारो स्त्र्ााr-पुरुष नागरिकांनी तीन किलोमीटरची मानवी साखळी केली होती.

इचलकरंजीसाठी ‘अमृत योजनें’तर्गत दूधगंगा नदीतून कागल तालुक्यातील सुळकूड गावाजवळून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, नदीकाठावरील नागरिक विरोध करत आहेत. त्यातच 15 दिवसांपूर्वी कागलच्या नेत्यांनी ही योजना होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर इचलकरंजीमध्येही याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सुळकुड पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी येथील सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिक एकवटले आणि सुळकुड पाणी योजना कृती समिती स्थापन केली आहे. या समितीतर्फे हे पहिलेच आंदोलन आहे.

शहरातील सांगली नाका ते जुना पोटफाडी चौक अशी सुमारे तीन किलोमीटर लांब मानवी साखळी पाहण्यास मिळाली. क्रांतिदिनी झालेल्या या आंदोलनात सांगली रोड परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. सुळकुड पाणी योजना तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात कृती समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुलांचाही सहभाग होता. यावेळी पाण्यासाठी घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनाला आमदार प्रकाश आवाडे, विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, अजित जाधव, सयाजी चव्हाण, संजय कांबळे, बाळासाहेब कलागते, प्रकाश मोरबाळे, अशोक स्वामी आदींसह कार्यकर्ते व नेते हजर होते.

येणाऱया काळात इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न प्रशासन कश्या पध्दतीने हाताळणार हे पहावे लागणार आहे.

निवडणुकांवर परिणाम

n शहरासाठी सध्या पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीतून पाणी उपसा केला जातो. पंचगंगा नदी प्रदूषित असल्याबाबत आरोप आहे. तर कृष्णा योजना 18 किलोमीटरवरून उद्योगासाठी पाणी आणले आहे. यापूर्वी दानोळी (हातकणंगले) या गावाजवळून वारणा नदीचे पाणी घेण्याबाबत शासनाने मंजुरी दिली होती. निधीही पाठवला होता. पण दानोळीसह शिरोळमधील अनेक गावांनी विरोध केला, यामुळे ही योजना बारगळली. याचा मोठा फटका राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत बसला होता.