इचलकरंजीतील भाजीमार्केट आगीत भस्मसात, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी येथील महापालिकेच्या आण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोरील भाजी मार्केटला शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये भाजीमार्केट भस्मसात पडले असून, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. महापालिकेने याची चौकशी करून आपत्कालीन निधीमधून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या भाजी मार्केटमध्ये किरकोळ आणि होलसेल भाजीपाला, फळ विक्री करणारे 24 गाळेधारक आहेत. शुक्रवार या आठवडा बाजाराच्या निमित्ताने व्यापाऱयांनी मोठय़ा प्रमाणात भाजीपाला व फळे खरेदी केली होती; मात्र रात्रीच्या वेळी आग लागून प्लॅस्टिकच्या कॅरेटसह भाजीपाला जळून खाक झाला. सुदैवाने रात्रीच्या वेळी आग लागल्याने ग्राहक नव्हते. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला कळताच पथकाने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, याबाबत महापालिकेला निवेदन देऊन आपत्कालीन निधीमधून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. इमारत जुनी असून, यातील वायरिंग 35 वर्षांपूर्वीचे असल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक विक्रेत्यांनी स्वतः खर्च करून पत्रे, जाळ्या, लाकडी साहित्य, क्रेट्स असे साहित्य ठेवले होते, याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली.