खाऊगल्ली – अस्सल उत्तर भारतीय खाण्यासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीव साबडे

इडली-डोसा उडप्यांकडचा, मिसळ-साबुदाणा खिचडी मराठी रेस्टॉरंटची तसंच उत्तर भारतीयांची समोसा, कचोरी, पाणीपुरी, दही बटाटापुरी असे चटपटीत प्रकार, पुरी भाजी, दाल पकवान, छोले भटुरेसारखे जेवणाचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. याच्या जोडीला असतात ते मिठायांचे प्रकार जे खावेत कराची स्वीट्स, चंदु हलवाई, झामा स्वीट्ससारख्या पंजाबी, सिंधी हलवायांकडीलच.

मुंबई आणि पाकिस्तानातील कराची शहराचं नातं अतिशय जुनं आहे. ब्रिटिश काळात कराची शहर बॉम्बे प्रेसिडन्सीचा भाग होतं. मुंबई विद्यापीठाचा पसाराही कराचीपर्यंत होता. दोन्ही शहरांतील लोकांचं येणं-जाणं होतं, मैत्री होती. दोन्ही शहरांतील लोकांचा एकमेकांशी संवादही होता. कराचीत आजही नारायण जगन्नाथ वैद्य यांच्या नावाने एक शाळा आहे. कराचीत बॉम्बे स्वीट्स हे प्रसिद्ध व लोकप्रिय दुकान आहे. कराचीहून स्वातंत्र्यपूर्व काळात आलेल्या अनेक मंडळींची मुंबईत मिठाईची दुकानं व रेस्टॉरंट आहेत. अत्यंत उत्तम दर्जाची मिठाई आणि तिखट-मिठाचे पदार्थ हे वैशिष्टय़ त्यांनी वर्षानुवर्षे कायम राखले आहे. अनेक उत्तर भारतीय व गुजराती मंडळींचीही मिठाई व नमकीनची दुकानं आहेत. या मंडळींची तुपात केलेली मिठाई तर लाजवाब असतेच, पण समोसे, कचोरी, भटुरे व पुऱया, पराठे असे अनेक प्रकार तुपात बनवले जात असल्याने त्यांची चव वेगळीच असते. आपल्यापैकी अनेक जण कधी ना कधी तिथे गेलेही असतील,
सुरुवातीला कुलाबा व दक्षिण मुंबईत असलेली ही दुकानं व रेस्टॉरंट आता पूर्व व पश्चिम उपनगरांतही विस्तारली आहेत. सिंध प्रांतातील मुलचंदानी नावाच्या गृहस्थांचा कराचीत खाद्यपदार्थांचा एक टपरीवजा स्टॉल होता. त्यांचा धंदा खूप चालायचा. फाळणीनंतर मुलचंदानी कराची सोडून मुंबईत आले आणि त्यांनी कुलाब्यात कैलास पर्बत रेस्टॉरंट सुरू केलं. पाणीपुरी, दही पापडी, दही बटाटापुरी अशा असंख्य चाट प्रकारांपासून दाल पकवान, छोले भटुरे, समोसा, कचोरी, मक्के की रोटी व सरसो का साग असे असंख्य पंजाबी व सिंधी खाद्यपदार्थ ही त्यांची खासियत. आता सांपूझ विमानतळ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, वसई, पालघर, ठाणे, उल्हासनगर, वाशी, पुणे आणि काही देशांमध्ये कैलाश पर्बतचा पसारा वाढला आहे.

फोर्टच्या कावसजी पटेल मार्गावरील सावला चेम्बर्सच्या तळमजल्यावरील प्रचंड जागेत पंजाबी मोती हलवाई कराचीवाला पसरला आहे. सर्वसामान्यांना परवडेल असं हे ढाबा पद्धतीचं
रेस्टॉरंट. याला दरवाजा नाहीच. एका बाजूला लस्सी बनवली जाते आणि दुसऱया बाजूला मोठय़ा विविध मिठाया मांडून ठेवलेल्या. त्या दोन्हींच्या मधून पायऱया चढत जायचं. तिथं असंख्य टेबलं व बसायला बाकडी. समोसे, कचोरी, मुगाची भजी, पनीर पकोडे, दाल पकवान, पकवान छोले, छोले भटुरे, पुरी व सुकी भाजी, राइस प्लेट, खास पंजाबी तडक्याच्या भाज्या आणि अनेक प्रकारचे रायत्याचे प्रकार, तवा पुलाव, पनीर पराठा, लच्छा पराठा सारे अगदी ऑथेंटिक. इथे कायम गर्दी असते.

पुढे झवेरी बाजारात आला की, तिथे हमखास जायचं ठिकाण म्हणजे भगत ताराचंद. आता ही मंडळी बी. भगत ताराचंद, के. भगत ताराचंद अशी वेगळी झाली असली तरी सर्वांकडचं जेवण मात्र अप्रतिम. हे ताराचंदही मूळचे कराचीचे. पहिलं भगत ताराचंद मुंबईत सुरू झालं 71 वर्षांपूर्वी. त्याआधी 1895 साली मूळ पुरुष ताराचंद यांनी काही काळ कराचीत टपरीवजा रेस्टॉरंट चालवलं. लोकांकडे पैसे नसले तरी ते त्यांना जेवू घालत. त्यातूनच त्यांना भगत ही उपाधी मिळाली. त्यांच्याकडील व्हेज कबाब, पनीर टिक्का, आलू तंदुरी, तंदुरी मशरूम व बेबीकॉर्न, पनीर मेथी भुर्जी हे प्रकार एकदम मस्त. त्याशिवाय तीन प्रकारची जेवणाची थाळी आहे. एक थाळी म्हणजे पोटभरीची व्यवस्था. त्यांच्याकडील मसाला ताकाच्या बाटल्या (ते कच्छी बीअर नावाने ओळखले जाते) लोक घरीही घेऊन जातात. एरवी जी भाजी आपल्याला आवडत नाही, ती अनेकजण इथे प्रेमाने खातात. याचं कारण चव. आता भगत ताराचंदची एकूण 20
रेस्टॉरंट मुंबई, पुणे, बंगळुरूमध्ये आहेत.

ग्रँट रोडच्या मिनर्व्हा सिनेमापाशी असलेल्या पंजाबी घसिटाराम हलवाई कराचीवाला यांच्याकडेही मिठाई व नमकीनसाठी प्रामुख्याने तुपाचाच वापर असतो. येथील पटियाला छोले पुरी, आलू छोले पुरी, समोसा वा कचोरी छोले, राजमा चावल, राजमा पुरी, छोले चावल ही पोटभरीची आहेत. शिवाय दही बटाटापुरी, दही भेळ, दहीवडा, स्पेशल चाट यांचाही आस्वाद घ्यावा. त्यांनी तर फाळणीत कराचीमधील सारं गमावलं आणि मुंबईत येऊन नव्याने साम्राज्य उभं केलं.

कराचीत चंदूभाई बहल यांनी 1896 साली मिठाईचं पहिलं दुकानं सुरू केलं. देशाची फाळणी झाल्यानंतर त्यांचे सारे कुटुंबीय पाकिस्तान सोडून मुंबईत आले. मूळ व्यवसाय हलवायाचा. त्यामुळे इथेही त्यांनी पंजाबी चंदू हलवाई कराचीवाला या नावानेच पहिलं दुकान सुरू केलं. आज चंदू हलवाई कराचीवालाचा व्याप प्रचंड वाढला आहे. ते आहेत मिठाईसाठी प्रसिद्ध, पण त्यांच्याकडील समोसा आणि कचोरीला तसंच नमकीनला तोड नाही.

फाळणीच्या वेळी काही लाख लोक कराचीतून भारतात आले. महाराष्ट्रात उल्हासनगर व मुंबईतील चेंबूरमध्ये त्यांची मोठी वस्ती आहे. मोठा सिंधी कॅम्प चेंबूरमध्ये आहे आणि तिथेच आहे झामा स्वीट्स. झामामल लुल्ला यांनी ते सुरू केलं. आता पुढच्या पिढय़ा ते चालवत आहेत. हे नावाप्रमाणे सिंधी, पंजाबी, उत्तर भारतीय मिठायांसाठी लोकप्रिय असलं तरी तेथील समोसा छोले, दही कचोरी, ब्रेड रोल, असंख्य प्रकारचे चाट, ढोकळा, पॅटिस छोले, दहीवडा हे मस्त! ते खाल्ल्यावर तिथली कुल्फी अवश्य खावी आणि जिलबी घरी न्यावी. कराचीचा हलवा हा जगभर प्रसिद्ध. माहीम हलव्यापेक्षा जास्त मागणी असणारा. पंजाब, सिंध व एकूणच उत्तर भारतात आपल्यापेक्षा मिठाया बनवण्याचं आणि खाण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यांची खासियत असलेली एखादी तरी मिठाई खावी वा आणावी.

उत्तर भारतीय जेवणासाठी बोरीबंदरजवळच्या बोरा बाजारात (पेरिन नरीमन स्ट्रीट) असलेला पंचम पुरीवाला. तब्बल 170 वर्षे ते ग्राहकांना किफायती दरात पुरीभाजी खायला घालत आहेत. पंचम शर्मा नावाचे गृहस्थ तेव्हा आग्य्राहून चालत मुंबईला आले. त्यांनी त्या परिसरात पुरी भाजीचा ठेला लावला. त्यांच्या हातच्या चवीमुळे धंदा वाढला आणि मग ते बोरा बाजारात आले. सकाळ, दुपार, संध्याकाळ… कधीही जा, तिथे लोक खायला येतच असतात. महात्मा गांधी, राजेश खन्ना यांनीही इथल्या जेवणाचं कौतुक केलं होतं. मसाला, मेथी पुरी, कधी पुरी, विविध प्रकारच्या भाज्या, पंचरंगी लोणचं, पुरी, पराठे, चपाती यांनी सजलेलं जेवणाचं ताट हे इथलं वैशिष्टय़ आहे. एकेकाळी ते काहीसं अस्वच्छ व कळकट दिसायचं, पण आता ते स्वच्छ व चकचकीत झालं आहे.

पंचम पुरीवाला वगळता सर्वांकडे मिठाई आहे. तसेच दादरच्या खोदादाद सर्कलचे डी. दामोदर आणि परळ नाक्यावरचे गौरीशंकर छितरमल हे दोन मिठाईवालेही जुने व प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या उपनगरातून लोक खास या दोघांकडील मिठाई घ्यायला जात असतात. त्यांनी आपला दर्जा कायम राखला आहे. त्या दोन्ही ठिकाणी मिळणारा गरमागरम समोसा व खुसखुशीत कचोरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडण्याची इच्छा होतच नाही. इडली-डोसा उडप्यांकडचा, मिसळ-साबुदाणा खिचडी मराठी रेस्टॉरंटची तसंच उत्तर भारतीय जेवण, स्नॅक्स व मिठाई पंजाबी, सिंधी वा यूपीवाल्यांकडचीच मस्त!

[email protected]