
गणेशोत्सव महिनाभरावर आल्याने अनेक मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपाकडे प्रस्थान सुरू झाले आहे. मात्र मंडपाकडे जाताना रस्त्यावर अक्षरशः ‘खड्डय़ांची रांगोळी’ असल्याने मंडळांच्या नाकीनऊ येत आहेत. शिवाय आगमन मार्गावर ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या धोकादायकरीत्या वाढल्याने मोठमोठय़ा मूर्ती न्यायच्या कशा, असा प्रश्न मंडळांना पडला आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव समितीसोबत झालेल्या बैठकीत ही कामे करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र अद्याप कार्यवाही झाली नसल्याने पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबईतील अनेक मंडळांच्या मंडपामध्ये मोठय़ा गणेशमूर्ती असतात. शिवाय या ठिकाणी आकर्षक देखावे, सजावट, चलचित्रेही साकारली जातात. त्यामुळे गणेशोत्सवाआधी एक ते दीड महिना मूर्ती मंडपाकडे रवाना होतात. त्यामुळे सद्यस्थितीत गणेशोत्सव महिन्यावर आल्याने सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आहे. मात्र गणेशमूर्ती नेण्याच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे असल्याने मंडळांची कोंडी होत आहे. यातच या वर्षी मंडळांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याची मुभा असल्याने मोठमोठय़ा मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. मात्र रस्त्यावरील धोकादायकरीत्या आलेल्या फांद्या मार्गात अडथळा ठरत आहेत.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
अंधेरी पश्चिम येथील गजानन भक्त उत्सव समितीच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याचे अध्यक्ष अविनाश कांबळी, चिटणीस अरुण मयेकर यांच्याकडून सांगण्यात आले. अंधेरी पश्चिम येथील पानिपत मैदानापासून मोगरापाडा सर्व्हिस रोड, गजानन मंदिर या ठिकाणी फांद्या धोकादायक असल्याने छाटण्याबाबत कार्यवाही करावी यासाठी जूनमध्ये के/पूर्व विभागातील उद्यान विभागाला पत्र देण्यात आले. या फांद्या रहिवासी आणि प्रवाशांसाठीही धोकादायक आहेत. मात्र पालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मार्गाची पाहणी केल्यानंतरच मूर्ती न्यायला या!
गेल्या आठवडय़ाचा विकेंड आणि या आठवडय़ाला जोडून सुट्टय़ा आल्याने अनेक मंडळांच्या मूर्ती मंडपाकडे रवाना झाल्या. यामध्ये लालबाग, परळ परिसरात मोठय़ा प्रमाणात आलेल्या मंडळांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मंडळांनी मूर्ती नेण्याआधी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीशी संपर्क करावा, जेणेकरून या भागातील रस्ते दुरुस्ती आणि फांद्या छाटणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आवाहन अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
अशी होतेय गैरसोय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ नाका ते काळाचौकी नाका या मार्गावर दुतर्फा झाडांच्या फांद्या धोकादायकरीत्या रस्त्यावर आल्याने मूर्ती नेण्यात अडथळा येत आहे.
- एल वॉर्ड कुर्ल्यात सफेद पूल-डिसोझा कंपाऊंड या ठिकाणीही हीच स्थिती आहे. दोन्ही उपनगरात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे.
- लालबाग, परळसह संपूर्ण मुंबईत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे समतलीकरण करण्यात आल्यामुळेही मूर्ती नेणे कठीण बनत आहे.






























































