
हिंदुस्थानचा ज्युनियर हॉकी संघ शुक्रवार, 18 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या चार देशांच्या चौरंगी ज्युनियर हॉकी स्पर्धेत स्पेनविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानास प्रारंभ करेल. या स्पर्धेत हिंदुस्थानसह स्पेन, जर्मनी इंग्लंड या संघांचा समावेश आहे.
हिंदुस्थानच्या ज्युनियर हॉकी संघाने जूनमध्ये ओमानमध्ये झालेली आशियाई स्पर्धा जिंकून वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले होते. सराव शिबिरात जखमी झालेल्या उत्तम सिंहच्या जागेवर विष्णुकांत सिंह हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करणार आहे. आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड असलेला संघ असून आम्ही या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा प्रतिस्पर्धी संघांना दिलाय. स्पर्धेचा विजयी प्रारंभ करण्यासाठी आम्ही आतूर झालोय. ज्युनियर वर्ल्ड कपपूर्वी युरोपमधील सर्वोत्तम संघांविरुद्धची ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. या स्पर्धेतील अनुभव आमच्यासाठी नक्कीच लाखमोलाचा असेल, असेही विष्णुसिंहने सांगितले. स्पेनने 2019 मध्ये माद्रिदमध्ये झालेल्या 21 वर्षांखालील स्पर्धेत हिंदुस्थानला 3-1 गोलफरकाने हरवले होते. दुसऱया लढतीत 19 ऑगस्टला हिंदुस्थानची गाठ यजमान जर्मनीशी पडेल. त्यानंतर 21 ऑगस्टला हिंदुस्थानचा सामना इंग्लंडशी होईल. अव्वल स्थानी राहिलेल्या दोन संघांमध्ये 22 ऑगस्टला अंतिम लढत रंगणार आहे.
हिंदुस्थानने 2016 पासून आतापर्यंत झालेल्या चार लढतींत स्पेनला तीन वेळा हरवलेले आहे. 2013 पासून आतापर्यंत झालेल्या चार लढतींत हिंदुस्थानने जर्मनीविरुद्धही तीन विजय मिळवलेले आहेत. याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने जर्मनीचा 4-2 गोलफरकाने हरवले होते. लखनऊमध्ये 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने इंग्लंडचाही 5-2 गोलफरकाने धुव्वा उडवला होता. या स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंच्या क्षमतेचा खरा कस लागेल, अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी दिली.




























































