
नागरिकांची आता लवकरच कागदी पासपोर्टच्या कटकटीतून सुटका होणार आहे. पासपोर्टधारकांना चिप असलेला ई-पासपोर्ट मिळणार आहे. या पासपोर्टमध्ये 41 प्रकारची विविध वैशिष्टय़े आहेत. त्यामुळे तब्बल 140 देशांमध्ये इमिग्रेशन प्रक्रिया जलद होणार आहे. सदरचे ई-पासपोर्ट तयार करण्याचे काम केंद्र सरकारने नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसला दिले आहे.
देशातील सामान्य नागरिकांना येत्या दोन महिन्यांत हा पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. चिप असलेल्या या पासपोर्टच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या वर्षी तब्बल 70 लाख ई-पासपोर्ट कोऱया पुस्तिका छापल्या जाणार आहेत. या पासपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना मानकांचे पालन करणाऱया 140 देशांमधील विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. ई-पासपोर्टसाठी पासपोर्ट केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून पासपोर्ट केंद्रांना तांत्रिकदृष्टय़ा अपग्रेड केले जात आहे.
विमानतळांवर बायोमेट्रिक यंत्रणा
ई-पासपोर्टसाठी विमानतळावर सर्व आधुनिक बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यात पासपोर्टमध्ये साठवलेली चेहऱयाची प्रतिमा आणि इमिग्रेशन दरम्यानची थेट प्रतिमा काही सेकंदात जुळवली जाईल. कोणी आपल्या चेहऱयात बदल करून आला असेल तर त्याला तत्काळ पकडणे शक्य होणार आहे. सध्याच्या पासपोर्टमधील जुना फोटो आणि संबंधित व्यक्तीचा सध्याचा चेहरा जुळवताना, ओळख पटवताना वेळ लागतो. तो यामुळे कमी होऊ शकणार आहे.
ई-पासपोर्ट सध्याच्या कागदी पासपोर्टसारखाच असणार आहे. पुस्तिकेप्रमाणेच दिसायला असलेल्या या पासपोर्टच्या मध्यभागी एका पानावर रेडिओ फिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि शेवटी एक लहान फोल्डेबल अँटेना असणार आहे. दरम्यान सदरच्या चिपमध्ये संबंधितांचा बायोमेट्रिक तपशील आणि आधीच्या पासपोर्टमध्ये असलेल्या माहितीचा समावेश असणार आहे.


























































