केंद्राच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात शेतकरी रस्त्यावर, लिलाव बंद; गाड्या रोखल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावण्याचा निर्णय जाहीर करताच आज नगरमधील अनेक बाजार समितीत शेतकऱयांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे भाव सातशे रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱयांनी लिलाव बंद पाडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी बाजार समितीत केंद्र सरकारचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, बाजार समितीसमोरील नगर-मनमाड रास्ता रोको करून बंद करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत कांद्याला कमी भाव मिळत होता. त्यानंतर आठ दिवसांपासून कांद्याचे भाव तुलनेने वाढल्याने शेतकऱयांनी कांदा विक्रीस काढला होता. मात्र, शनिवारी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील करात चाळीस टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आज विविध बाजार समितींत शेतकऱयांनी कांदा विक्रीस आणल्यानंतर कांद्याचे दर सरासरी सातशे ते आठशे रुपयांनी कमी पुकारले गेले. कांद्याला कमी दर मिळत असल्याने शेतकऱयांनी लिलाव बंद पाडत राहुरी बाजार समितीसमोरील नगर-मनमाड रोड अडवून धरला. यावेळी शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी करत फेरलिलावाची मागणी केली.