
>> वैश्विक [email protected]
काल संध्याकाळी केवळ आपल्या देशाचीच नव्हे तर साऱया जगाची नजर खिळलेला क्षण आला आणि ‘इस्रो’ने तो जिंकला! चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरवणारा हिंदुस्थान हा जगातला पहिला देश ठरला. ‘आभाळमाया’ छापता छापता ही सुखद वार्ता आली. आता चांद्रयानाचे नियोजित कार्यक्रम कसे पार पडतात याचा आढावा नंतर घेऊ; पण ही वेळ ‘इस्रो’च्या सर्व संशोधकांचा अभिमान बाळगण्याची आहे!
आपले चांद्रयान-3 चांद्रकक्षेत पोचण्याच्या तयारीत असतानाच रशियाचे ‘ल्युना-25’ ही तब्बल 47 वर्षं खंडित झालेली चांद्र मोहीमही सुरू झाली. त्यांच्या वेगवान यानाचं चंद्रावतरण आधी होईल की चांद्रयान-3 यानाचं असा एक ‘सस्पेन्स’ निर्माण झाला. परंतु ल्युना-25ला अपयश आलं. आपल्यालाही गेल्या वेळी अपयशाचा कटू अनुभव आलाच होता. या वेळी मात्र संशोधकांनी योग्य ती खबरदारी घेऊन सावधपणे चंद्रावतरण केलं!
युद्धग्रस्त रशिया गेल्या वर्षी चांद्रयान धाडण्याच्या मनःस्थितीत नसला तरी त्याची म्हणजे ‘ल्युना-25’ मोहिमेची आखणी फार पूर्वीच झालेली असणार आणि नेमक्या एकाच तारखेला हिंदुस्थानचं ‘चांद्रयान-3’ तसेच रशियाचं ‘ल्युना-25’ चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा योगायोग कदाचित जुळला असता; पण रशियन यान 20 ऑगस्टला चंद्रावर कोसळले. 11 ऑगस्टला उडालेल्या ‘ल्युना-25’चा चांद्रप्रवास अवघ्या 10 दिवसांत आटोपला, तर आपलं यान 14 जुलै ते 23 ऑगस्ट एवढय़ा काळानंतर चंद्रावर पोहोचणार हे आधीच ठरलं होतं. हे सर्व सेकंदासेकंदाचा हिशेब करून ठरवावं लागतं.
‘चांद्रयान-3’मध्ये गेल्या वेळेसारखी अखेरच्या क्षणाची गफलत होऊ नये म्हणून ‘ऑटिटय़ूड करेक्शन’ सिस्टीम बसवली होती. त्यामुळे शेवटी अवतरणाचा घोळ होणार नव्हता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणी गेलं नसल्याने तिथे प्रयोगयान (विक्रम) आणि चांद्रवाहन (प्रज्ञान) उतरवणं ही एक ऐतिहासिक गोष्ट ठरणार याची कल्पना होती. मात्र रशियाने त्यांच्या ‘नियोजित’ वेळेनुसार ‘ल्युना-25’ नेमकं त्याच भागात त्याच दिवशी उतरवण्याचं ठरवल्यामुळे आपल्या दोन देशांत या मोहिमांची स्पर्धा वगैरे आहे की काय किंवा रशियाने हे मुद्दामच केलं असेल काय, अशी चर्चा अनेक ‘चर्चिल’ लगेच करू लागले होते. ‘इस्रो’ने मात्र अवकाशी सहकार्याची भूमिका घेत 11 ऑगस्टला ‘ल्युना-25’चं यशस्वी उड्डाण होताच रशियन स्पेस एजन्सीला संदेश पाठवून त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि ‘‘आता आपली भेट चंद्रावरही होईल!’’ असं म्हटलं होतं. हिंदुस्थानी संस्कृतीचा हा आविष्कार आहे. तरीही सुप्त स्पर्धा नसेलच का? असेलच आणि असावीसुद्धा. कारण स्पर्धा म्हणजे वैर नव्हे. खेळात काय किंवा विज्ञानात काय प्रतिस्पर्धी शत्रू असू शकत नाही. पहिला क्रमांक मिळवणाऱया स्पर्धकाचं कौतुक हरणाराही करतोच. इथे तर हार-जीत असा प्रश्नच नाही. कोण कुठलं संशोधन करणार आणि पुढे ते संपूर्ण मानव प्रजातीला कितपत उपयुक्त ठरणार ते महत्त्वाचं.
आपलं ‘चांद्रयान-3’ आणि रशियन ‘ल्युना-25’ यांची बरीच उद्दिष्टे समान होती. आपण ठरवलं की, चंद्राच्या पृष्ठभागावरील भूकंपनांची नोंद, तेथील माती-खडकात असणारी खनिजं आणि रसायनांचा शोध, चंद्रावर होणाऱया अशनी आघातांचा परिणाम अभ्यासणे, चंद्रावरील वातावरणात बदल किंवा उक्रांती कशी होत गेली याचा मागोवा घेणे अशी अनेक उद्दिष्टे चांद्रयानाने ठरवली आहेत.
प्रज्ञान या सहाचाकी वाहनाने साधारण 1600 फूट ‘प्रवास’ करत चांद्रपृष्ठाचा अभ्यास करावा, तिथले फोटो काढावेत, ड्रिलद्वारे खोदकाम करून मातीचे नमुने घ्यावेत आणि त्याची माहिती ‘विक्रम’ लॅण्डर (अवतरक) तसेच ‘इस्रो’च्या हिंदुस्थानातील संशोधन केंद्राकडे त्वरित पाठवावी असा एकूण तीन ते सहा महिन्यांचा चांद्र-अभ्यास! त्यातून आपल्या या नैसर्गिक उपग्रहाचं अधिक आकलन होईल, ते जगातल्या सर्व संशोधकांना कळवावं हेही ओघाने आलंच. तसंही अवघ्या जगाचं लक्ष 14 जुलैपासून ‘चांद्रयान-3’कडे होतंच. अखेर 23 ऑगस्टला चांद्रयान-3 सुरक्षित लॅण्ड झाले. ‘चांद्रयान-2’च्या अपयशाने सावध होऊन या वेळी इस्रोचे एस. सोमनाथ आणि त्यांच्या टीमने योग्य ती काळजी घेतली. अपयशाने खचून न जाता चार वर्षांत पुन्हा चंद्राकडे झेप घेणं हे संशोधकांच्या जिद्दीचं प्रतीक. तिथे यशापयशापेक्षा प्रयत्न मोलाचे ठरतात. अर्थात यशासारखं आनंददायी दुसरं काय असतं?






















































