
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे. मिलिंद हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत होते; परंतु शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी दिली आहे. मिलिंद यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मिलिंद यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘सांग तू आहेस का’, ‘हंड्रेड डेज’, ‘पुढचं पाऊल’ आदी मालिकांतून ते घराघरात पोहोचले. ‘मेकअप’, ‘थँक यू विठ्ठला’, ‘पोस्टर बॉय’, ‘छडी लागे छम छम’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘टार्गेट’ अशा मराठी चित्रपटांत त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.


























































