माझगाव, गोवंडीतून बालकामगारांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतल्या दारूखाना येथील एका बॅग बनवणाऱया कारखान्यातून 12 आणि गोवंडी येथील कारखान्यातून एका बालकामगाराची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी शिवडी आणि शिवाजीनगर पोलिसांनी कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

बालकामगारांना कधी शिक्षणाच्या नावाखाली तर खोटी आश्वासने देऊन मुंबईत आणले जाते. त्यानंतर विविध झोपडपट्टीमधील छोटे कारखाने, भटारखाने येथे कामाला जुंपले जाते. कोवळय़ा हातांना कामासाठी जुंपणाऱया मालकाविरोधात पोलीस आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन कारवाई करत असतात. दारूखाना येथे एका बॅग बनवणाऱया कारखान्यात अल्पवयीन मुलाला कामाला ठेवले जात असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली. त्या संस्थेने याची माहिती मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पथकास दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या कारखान्यात छापा टाकून 12 अल्पवयीन मुलांची सुटका केली.

त्या मुलांना बॅगचे धागे कापण्याचे काम दिले होते. त्यांना दहा ते बारा राबवले जात होते. ती सर्व मुले बिहारची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी कारखान्याच्या मालकाविरोधात मुंबई बाल अधिनियम 1948 अंतर्गत गुन्हा दाखल केला, तर शिवाजीनगर येथे एका कारखान्यात मुलांना कामाला जुंपले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी त्या कारखान्यात छापा टाकला तेव्हा एक अल्पवयीन मुलगा तेथे काम करत होता. पोलिसांनी त्या मुलाची सुटका केली. त्या कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला.