
आपण आज कायद्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने माहिती पाहणार आहोत. देशातील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीशी संलग्न 22 नामांकित विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट आयोजित केली जाते.
पात्रता तसेच आरक्षणाप्रमाणे प्रत्येक विधी विद्यापीठाच्या पदवी (यूजी)/पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. इतर निकष विद्यापीठांच्या संबंधित नियमांनुसार असतात.
– सीएलएटी ही देशपातळीवरील सामान्य प्रवेश परीक्षा आहे. – सीएलएटी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. – पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी, उदा. 10+2 किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य. – खुला गट, इतर मागास वर्ग, दारिद्रय़ रेषेखालील, अनिवासी भारतीय इ. प्रवर्गांतील उमेदवारांच्या बाबतीत 45 टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी.
– अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 40 टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी.
पुढील वर्षी मार्च/ एप्रिलमध्ये पात्रता परीक्षेस प्रविष्ट होणारे उमेदवार सीएलएटी 2024 परीक्षेस पात्र ठरतील.
सीएलएटी सामान्य प्रवेश परीक्षा
– एकूण गुण 120 l परीक्षा कालावधी 2.00 तास
– बहुपर्यायी प्रश्न – 150 (एक प्रश्न एक गुण)
– 0.25 गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातात.
– परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत
प्रत्येक वर्षी सीएलएटी सामान्य प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी साधारण माहे जानेवारीमध्ये सुरू होते. उमेदवारांना प्रथम वैयक्तिक मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी वापरून दिलेल्या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक असते. http://consortiumofnlus.ac.in या वेबसाइटवर खालील आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करून आपली नोंदणी करावी. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने प्रमाणपत्रे साक्षांकित करून देण्याची आवश्यकता नसते. सर्व प्रमाणपत्रे केवळ पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत.
– पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र. – उमेदवाराची सही. – अनुसूचित जाती / जमाती / इतर मागास वर्गअंतर्गत अर्ज करत असल्यास प्रमाणपत्र.
– शारीरिकदृष्टय़ा अक्षम असल्यास सक्षम प्राधिकरणाद्वारे संबंधित प्रमाणपत्र.
– दारिद्रय़ रेषेखालील वर्गात येत असल्यास सक्षम प्राधिकरणाद्वारे संबंधित प्राप्त प्रमाणपत्र.
प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमता, संपूर्ण अभ्यासक्रम व प्रवेश शुल्क इ. माहिती त्या त्या वर्षी विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर पहावी. सीएलएटी परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशातील 22 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात.
– सुदाम कुंभार
(निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)





























































