उत्तम आवाजासाठी करा जिभेचे व्यायाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2 जिभेचे चोचले पुरवायला सर्वांनाच आवडतात, पण याच जिभेचे व्यायाम करणे हेसुद्धा आपला आवाज जपण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे सगळय़ात जास्त ज्या अवयवावर परिणाम होतो ती असते तुमची जीभ. तुमच्या आवाजाची तब्येत तुमच्या जिभेच्या तब्येतीवर अवलंबून असते. घोगरे आवाज, किनरे आवाज, जाड जीभ, पातळ जीभ इत्यादी दोषांवर योग्य व्यायाम प्रकार केल्यास उपाय करता येतो. जिभेचे व्यायाम केल्याने आपल्या स्मरणशक्तीतसुद्धा सुधार होते आणि पचनशक्तीपण वाढते. जीभ हा अवयव आहे. तुमचे उच्चार, तुमचे बोलणे सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि म्हणूनच आज जिभेचे व्यायाम समजून घेणार आहोत. या सर्व क्रिया निदान पाच वेळा एकामागोमाग एक कराव्यात.

कसा कराल व्यायाम
– जिभेचा शेंडा बाहेर काढून खालच्या बाजूला नेणे. जिभेचा शेंडा बाहेर काढून वरच्या बाजूला नेणे तसेच उजव्या बाजूला नेणे आणि जिभेचा शेंडा बाहेर काढून डाव्या बाजूला नेणे.
– लहानपणी चिडवायचो तशी जीभ डाव्या, उजव्या कडेला फिरवून करावे.
– यानंतर पुढचा व्यायाम आहे जिभेला आपल्या हिरडय़ांवर वरून खाली घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे गोल गोल फिरवणे आणि तीच प्रक्रिया ऑण्टिक्लॉकवाईज करणे.
– पुढचा व्यायाम आहे जिभेचा शेंडा वरच्या दातांच्या मागच्या बाजूला दाबून धरणे आणि जिभेचा शेंडा खालच्या दातांच्या मागच्या बाजूला दाबून धरणे.
– यानंतर पुढचा व्यायाम आहे जिभेला तुमच्या गालांमधून उजव्या बाजूने ढकलणे आणि त्या गालाला आपले बोट लावून त्यावर उलट दाब देणे. अगदी त्याच पद्धतीने डाव्या बाजूने करा.
– शितली या योगा व्यायाम प्रकारसारखे दोन्ही बाजूने मधून दुमडणे आणि तोंडाने दीर्घ श्वास घेणे.
– नरसिंह अवतारासारखे तुम्ही जीभ बाहेर काढून चेहरा अक्राळविक्राळ करावा. यामुळे चेहऱयामधील मांसपेशींना खूप छान पद्धतीची लवचिकता प्राप्त होते. हे सगळे करणे थोडे हास्यास्पद वाटते, पण याच्यामुळे
चेहऱयावरील मसल्सना, जिभेला खूप चांगला व्यायाम मिळतो. एक उत्तम वक्ता होण्यासाठी आपल्या शरीराला आपण जसा व्यायाम देतो तशीच आपल्या आवाजाची तब्येत सुधारण्यासाठी आणि तो भारदस्त बनवून आपल्या व्यक्तिमत्त्वाची लोकांवर छाप पाडण्यासाठी जिभेचे व्यायाम करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे.

>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)