
अजित पवार यांचा गट सत्तेत आल्यानंतर मिंधे गट आणि भाजपच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. अनेकांना आपल्या इच्छा आकांशांना ताळं लावावं लागलं आहे. तर काहींना मिळालेल्या पदावरून पाणी सोडावं लागलं. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याचा फटका बसला आहे. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐवजी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सांमत, अतुल सावे, दादा भुसे यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये भाजपाकडून विखे पाटील होते. मात्र राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे विखे पाटलांना बाहेर काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील समितीत आले आहेत.

























































