
>> वैश्विक, [email protected]
चांद्रयान-3च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोने अवघ्या दहा दिवसांतच आणखी एक यशस्वी पराक्रम केला. सूर्य या आपल्या जनक ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असलेल्या ‘लॅगरॅन्ज पॉइंट क्रमांक-1’च्या दिशेने पाठविण्यात आले. म्हणून या मोहिमेचा उल्लेख ‘आदित्य एल-1 यान’ असा केला जातो. हे यान या पॉइंटवर सुमारे 125 दिवसांनी पोहोचेल. तत्पूर्वी पुढच्या लेखात आपण ‘लॅगरेंज पॉइंट-1’ हीच जागा आपण या यानासाठी का निवडली आणि एकूणच लॅगरॅन्ज पॉइंटस् किती तसेच त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेऊ.
या लेखात चंद्रावरच्या दिवस-रात्रीचा विषय पुन्हा कदाचित उजळणीसारखा येत असला तरी वैज्ञानिक नियमांचा असा सोप्या शब्दांतील अभ्यास योग्य ठरतो. त्याला आताचं निमित्त आहे ते आपल्या ‘चांद्रयान – 3’ मोहिमेतील विक्रम अवतरक (लॅण्डर) चांद्रपृष्ठावर उतरल्यानंतर त्यातून अलगद बाहेर पडलेल्या सहाचाकी ‘प्रज्ञान’ या चांद्रवाहनाने म्हणजेच ‘मून रोव्हर’ने उत्तम कामगिरी बजावण्याचा डेटा उपलब्ध झाला आहे. गेल्या वेळी असाच प्रयोग काही क्षणांच्या गफलतीने फसला होता. यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृथ्वीवरून पहिलंच यान धाडताना एक धाकधूक होतीच, परंतु वैज्ञानिकांनी ते साध्य करून दाखवलं. ज्यासाठी हे ‘प्रज्ञान’ इथे पाठवलं त्याने काही प्रज्ञान किंवा मोठं विशेष ज्ञान अथवा माहिती जगातील सर्वच अंतराळ अभ्यास संस्थांसाठी पाठवली का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असल्याने आपलं जगात कौतुक होत आहे.
आपलं कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करून ‘प्रज्ञान’ 14 दिवसांनी निवृत्त होणार असल्याचं आधीच ठाऊक असल्याने त्याविषयी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण जोपर्यंत चंद्रावरच्या एका प्रदीर्घ दिवसांत सातत्याने मिळणारी सौर ऊर्जा जिथे 14 प्रदीर्घ रात्रींचा काळ आला की थांबणार. त्यानंतर प्रज्ञान ऑक्टिव्ह राहिलं तर आणखी 14 दिवसांनी पुन्हा त्याला सौर ऊर्जेचा लाभ होईल. याची कल्पना असल्यानेच वैज्ञानिकांनी या चांद्रवाहनाची रचना आणि क्षमता ठरवली. त्याने दिलेलं काम व्यवस्थित केलंय. पुढेही ते सुरू राहिलं तर तो बोनस असेल!
सूर्य आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती सौरमालेसकट 250 वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसांत एक परिक्रमा करते तर चंद्र पृथ्वीभोवती 29 दिवसांत फिरतो. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण सुरू असताना स्वतःच्या अक्षाभोवतीही गरगरणं सुरूच असतं. ते अवघ्या 24 तासांत होतं. म्हणून आपल्याला सरासरी दिवस-रात्रींचा काळ 12 तासांचा मिळतो. पृथ्वीचा अक्ष, साडेतेवीस अंशात कललेला असल्याने दिवस-रात्रीच्या वेळांमध्ये ऋतुचक्रानुसार बदल घडतो. त्यामुळे थंडीच्या काळात रात्र मोठी दिवस लहान (दक्षिणायन काळ) आणि उन्हाळय़ात दिवस मोठा, रात्र लहान (उत्तरायण काळ) असे नैसर्गिक आविष्कार पाहायला मिळतात.
चंद्रावर खरं तर दिवस-रात्र पृथ्वीपेक्षाही कमी वेळाची हवी. कारण त्याचं आकारमान पृथ्वीच्या एकचतुर्थांश इतकंच आहे असं अनेकांना वाटतं, परंतु चंद्राच्या दिवस-रात्रीचं गणित त्याच्या आकारावर अवलंबून नसून ते त्याच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर आधारित आहेत. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासांत फिरते, तर चंद्राला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीच्या दिवसाच्या तुलनेत 27.322 दिवस लागतात. म्हणजे चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती किती मंद गतीने फिरतो पाहा. आणखी एक गंमत म्हणजे चंद्र पृथ्वीभोवतीही साधारण एवढय़ाच काळात (29 दिवसांत) फेरी पूर्ण करतो. याचा अर्थ चंद्राचा एक महिना आणि एक दिवस थोडय़ाफार फरकाने सारख्याच गतीचा असतो. त्याच्या या ‘जिओसिन्क्रोनस’ किंवा पृथ्वीशी गतिमेळ साधल्याने चंद्राची केवळ एकच बाजू आपल्याला दिसते. हे दोन गोलकांच्या साध्या मॉडेलद्वारा समजावता येते.
याचा परिणाम मात्र असा होतो की, चंद्रावर प्रदीर्घ रात्र आणि दिवस ज्यांचा काळ प्रत्येकी पृथ्वीच्या साधारण पंधरवडय़ाइतका भरतो. साहजिकच प्रदीर्घ काळ सतत ऊन आणि अंधार असा प्रकार चंद्राच्या दक्षिण गोलार्धात घडतो. त्यातील उन्हाच्या काळात सौर ऊर्जा प्राप्त करून आपले ‘प्रज्ञान’ कार्यरत झाले. त्याने दिलेली कामगिरी किती क्षमतेने केली, कोणता ‘डेटा’ पाठवला आणि त्याची चांद्रमोहिमांसाठी भविष्यकाळात कोणती मदत होऊ शकेल याचं विश्लेषण व्हायला काही काळ जावा लागेल. आता हळूहळू अंधार पंधरवडय़ात जाणारं प्रज्ञान प्रचंड शीतकाळ सहन करून पुन्हा प्रकाशात आल्यावर काही करू शकतं का हे तेव्हा ठरेल. कदाचित ते पुन्हा पूर्ववत कार्य करू लागलं तर चंद्र अधिकाधिक समजून घेता येईल. त्याबद्दल आपणही एका पंधरवडय़ानंतरच विचार करू.
पुढच्या लेखात आदित्य सौरयान ज्या लॅगरेन्ज बिंदूकडे गेले आहे त्याचं वैज्ञानिक महत्त्व आणि एकूणच या गुरुत्वाकर्षणमुक्त पाच बिंदूंची सोपी माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. चंद्र-सूर्याशी ही वैज्ञानिक जवळीक आपल्याला बराच ज्ञानप्रकाश देणार आहेत.





























































