
चीन नियंत्रण रेषा (एलएसी)वर वेगाने निर्माण कार्यात गुंतला आहे, परंतु हिंदुस्थानही मागे नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने मोठे पाऊल उचलले आहे. येत्या दोन-तीन वर्षांत हिंदुस्थान चीनवर सहज मात करेल, असा ठाम विश्वास सीमा रस्ते संघटन (बीआरओ) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी गुरुवारी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार नियंत्रण रेषेच्या 3488 किमीच्या क्षेत्रात पायाभूत सुविधेच्या विकासाच्या दिशेने काम करीत आहे. चीनने हिंदुस्थानच्या खूप आधीपासून सीमारेषेवर पायाभूत सुविधेच्या विकासाच्या दृष्टीने काम सुरू केले होते. एका दशकापूर्वी सीमारेषेवर पायाभूत सुविधेच्या विकासासंबंधी आपला विचार थोडा बचावात्मक होता, परंतु सरकारने आता विचार आणि धोरण बदलले आहे. 2008 मध्ये तीन हजार कोटींचे बजेट होते. 2017 मध्ये यात वाढ होऊन ते पाच ते सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. 2019 मध्ये ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी 12 हजार 340 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे लेफ्टनंट जनरल चौधरी म्हणाले.
























































