
कमी पावसामुळे यंदा राज्यात ऊस उत्पादन 20 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, असे सांगत राज्य सरकारने राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घातली आहे. सरकारने यासंबंधीची अधिसूचना काढली आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून, जास्त दर देणाऱ्या कारखान्यालाच आमचा ऊस देणार, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. सरकारची अधिसूचना आम्ही उसाच्या सरीत गाडून टाकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी 30 एप्रिल 2024पर्यंत राहणार आहे. म्हणजे या कालावधीत शेतकऱ्यांना राज्याबाहेर आपला ऊस नेता येणार नाही.
…तर शिवसेनाप्रमुखांनी हातात उसाचा बुडका घेतला असता – राजू शेट्टी
‘राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणे हा मूर्खपणाचा निर्णय आहे. राज्य सरकारने भलेही कारखानदारांच्या कितीही दाढय़ा कुरवळल्या तरी आम्हाला जो कारखाना जास्त दर देईल, तेथेच आम्ही ऊस देणार. सरकारच्या या अधिसूचनेला उसाच्या सरीत गाडू. हिंमत असेल तर अडवून दाखवा,’ असा थेट इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस झोनबंदी हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकनाथ शिंदे हे पुन्हा ऊस झोनबंदीकडे वाटचाल करीत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर शिंदेंसाठी त्यांनी हातात उसाचा बुडका घेतला असता, असा घणाघात शेट्टी यांनी केला.





























































