
सर्केडियन रिदम म्हणजेच दैनिक लयबद्धता म्हणजेच निसर्गाच्या घड्याळाबरोबर शरीराचे घड्याळ सेट करायचे. एका व्यक्तीबरोबर मी फोनवर बोलत होते. त्याला ऑनलाईन डाएट हवे होते. मुख्य गरज म्हणजे बॉडी फॅट्स कमी करायचे होते आणि पोटावरचे फॅट्स कमी करायचे होते.
बराच वेळ बोलणं लांबत गेलं आणि तो बोलला की त्यांना 2007 मध्ये IBS (Irritable bowel syndrome) याचा प्रचंड त्रास होता आणि त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत गेला होता. त्यावेळी एक ठिकाणी निसर्गोपचार पेंद्रात 10 दिवस राहून त्याने काही उपाय तज्ञांच्या देखरेखीखाली केले. ज्यामुळे तो अक्षरशः मृत्यूच्या जबडय़ातून बाहेर आला. परंतु त्यांनी काय केलं हे ऐकण्यासारखं होते. सर्पेडियन रिदम म्हणजेच दैनिक लयबद्धता म्हणजेच निसर्गाच्या घडय़ाळाबरोबर शरीराचे घडय़ाळ सेट करायचे. पुरातन काळातील लोक ही पद्धत पाळत होतेच की. म्हणजे पहाटे कोंबडा आरवला की उठायचे, उठले की सकाळची कामे सडासंमार्जन झाले की न्याहारी करायची, मग दुपारी जेवण आणि संध्याकाळी लवकर जेवण आणि लवकर झोपणे!!
लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य संपत्ती लाभे असे पूर्वजांनी म्हटलेच आहे. पूर्वी विजेचे दिवे नव्हते की आतासारखे स्मार्ट फोन, एडियट बॉक्स आणि संगणक नव्हते. माणसाचे जीवन सरळ साधे होते आणि सूर्योदयाच्या आधी उठणे आणि अंधार पडला की झोपणे हे त्यांना माहीत होतं. भरपूर शारीरिक कष्ट आणि थकून छान झोप यामुळे त्यांचे जीवन निसर्गाच्या सुरात सूर मिळणारे असेच होते.
आयुर्वेदात त्याला दिनचर्या असे संबोधले गेले आहेच आणि त्याचे महत्त्वदेखील सांगितले आहे. आणि खूपच चांगल्या पद्धतीने ते सांगितले आहेच. आपल्यापाशी आपले पूर्वापार चालत आलेले असे स्वदेशी ज्ञान आहेच, पण आपल्याकडे जेव्हा ते पाश्चिमात्य अभ्यासातून समोर येते तेव्हाच त्यातील महत्त्व आपल्याला कळते हे खरं तर आपल्या पिचे दुर्दैव म्हटलं पाहिजे.
सध्या माझ्याकडे जे लोक येतात विशेष करून तरुण मंडळी किंवा आयटी सेक्टरमध्ये काम करणारे लोक! देशीविदेशी मीटिंगचे वेळापत्रक सांभाळताना त्यांचे या निसर्ग घडय़ाळाप्रमाणे काहीच चालू नसते. वर्क
फ्रॉम होम करतानादेखील 12- 12 तास काम असणे किंवा रात्री काम करणे, उशिरापर्यंत मीटिंग चालणे हे सर्व नाइलाज म्हणून असले तरी हानीकारक आहे. आणि मग हॉर्मोनल असुंतलन, पीसीओडी, पीसीओएस, मधुमेह, लठ्ठपणा या समस्या उद्भवतात.
आता मात्र विज्ञानाने दैनिक लयबद्धतेचे महत्त्व मान्य केले आहे. बरेचदा डाएट करताना आपण काय खायचं ते बोलतो किंवा किती वेळ खायचे यावर पण भरपूर चर्चा होते, पण कधी खायचे यावर खूप विचार केला जात नाही. वजन आणि चयापचय (मेटाबोलीझम) यांचा संबंध असतो हे तर सर्वाना माहितीच असते. याविषयी आणि निसर्गनियमानुसार डाएट कसे करावे, हे पुढील लेखात जाणून घेऊया.
– अर्चना रायरीकर, आहारतज्ञ































































