रवींद्र टोगेंचे 21 दिवसांनंतर उपोषण मागे; ओबीसी आरक्षण अबाधित राहील, सरकारचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र टोंगे गेल्या 21 दिवसांपासून चंद्रपुरात उपोषणाला बसले होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला जाणार नाही यांसह अन्य 22 मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर टोंगे यांनी आज आपले उपोषण मागे घेतले.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे हे 11 सप्टेंबरपासून आंदोलनाला बसले होते. काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की यांनी शनिवारी सकाळी उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकार ओबीसींच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ओबीसींसाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही. ओबीसी समाजाकरिता 26 जीआर आम्ही काढले आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.