नगरमध्ये वाळूतस्करी थांबता थांबेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाळूसंदर्भात राज्य सरकारने धोरण अवलंबले असले तरी नगरजिल्ह्यामध्ये ठिकठिकाणांहून वाळूची तस्करी सुरू असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले असून, वाळूतस्करांना रोखणार कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याजिल्ह्यात वाळूतस्करी सुरू असल्याच्या घटना घडत असून, यामुळे वाळूधोरणाचा बोजवारा उडताना दिसून येत आहे.

राज्य सरकारने वाळूसंदर्भामध्ये नवीन धोरण निश्चित केले आहे. याद्वारे आता घरपोच वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी नगरजिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. यासाठी नगरजिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत. नगरजिल्ह्यामध्ये कोपरगाव, कर्जत यांसह विविध ठिकाणी वाळू मोठय़ा प्रमाणामध्ये उपलब्ध होते. येथील वाळू उचलण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

वाळू विकत घेण्याबाबत जी काही नियमावली आहे ती पाहाता सर्वसामान्यांना वाळू मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वाळू मिळण्यासाठी आजही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाळूअभावी बांधकाम रखडण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिक वेगळा पर्याय निवडून वाळू मिळवित आहेत. प्रशासनाने मागेल त्याला वाळू मिळेल, असे सांगितल्यामुळे वाळूची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्याप्रमाणात प्रशासनाकडून वाळू उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे वाळूतस्करांचे पेव फुटताना दिसत आहे.

मागील महिन्यामध्ये वाळूसंदर्भामध्ये प्रशासनाने काही ठिकाणी कारवाई केली. त्यानंतर वाळूतस्करीविरोधात ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. प्रशासनाची नजर चुकवून आजही काही ठिकाणी वाळूचा उपसा मोठय़ा प्रमाणामध्ये केला जात आहे. कोटय़वधी रुपयांची वाळूची चोरी करून त्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. यामुळे नगरजिल्ह्यामध्ये एकीकडे वाळू घरपोच देण्याचा विषय होत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने वाळू चोरी होणार असेल तर या तस्करांना आवर कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळूतस्करीबाबत अनेकांनी तक्रारी जरी केल्या तरी याबाबत काही ठिकाणी दखल घेतली जाते, तर काही ठिकाणी काणाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरजिल्ह्यामध्ये वाळूतस्करीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे चित्र आहे.

संगमनेर तहसीलदारांना शिवीगाळप्रकरणी अद्यापि कारवाई नाहीच

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाळूचे धोरण आणले असले, तरी सरकारच्या वाळू डेपोतून वाळू खरेदी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. संगमनेर अकोले तालुक्यातील प्रवरा, माळुंगी, आढळा, मुळा या नद्यांमधून वाळूउपसा सुरूच आहे. विखे-पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आश्वी पंचक्रोशीतील गावे दाढ, चिंचपूर, जोर्वे या भागांतून वाळूतस्करी सुरूच आहे. वाळू डेपो करणारे रात्रीच्या वेळी वाळूउपसा करतात. काही दिवसांपूर्वी एका वाळूतस्कराने संगमनेरच्या तहसीलदारांना मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिवीगाळ करीत धमकी दिली होती. याप्रकरणी पुढे अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरणदेखील वाळू तस्करीतूनच घडल्याची चर्चा आहे.