
संपूर्ण मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला असताना हिंगोलीत लावणीच्या फडात फेटा उडविण्यात दंग असलेले गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्यावर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना जातिवाचक शिवीगाळ करून शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या 41 मृत्यू प्रकरणांमुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. त्यातच चमकोगिरी करण्यासाठी गद्दार खासदार हेमंत पाटील हे रुग्णालयात आले. ‘ज्या वॉर्डात रुग्ण मृत्युमुखी पडलेत तो मला दाखवा,’ असे म्हणत ते अधिष्ठाता डॉ.एस.आर. वाकोडे यांना घेऊन वॉर्डात आले. वॉर्डातील शौचालय दाखवून डॉ. वाकोडे यांना हे तुम्हीच स्वच्छ करा, असे सांगितले. स्वच्छता कर्मचार्यांकडून हे काम लगेच करून घेतो, असे डॉ. वाकोडेंनी सांगताच खासदार पाटील यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. दडपशाही करून डॉ. वाकोडे यांच्याकडून शौचालय स्वच्छ करून घेतले. चमकोगिरी करण्यासाठी पाण्याचा पाईप स्वत: हातात घेतला.
खासदार हेमंत पाटील यांच्या रझाकारीवरून रुग्णालयासह शहरातील सर्वच डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. खासदार पाटलांनी अगोदर आपल्या सरकारकडून रुग्णालयाला व्यवस्थित औषधींचा पुरवठा करून दाखवावा, अशी संतप्त प्रतिक्रियाही उमटली. त्यानंतर आज बुधवारी पहाटे 3 वाजता डॉ.एस.आर. वाकोडे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून खासदार पाटलांविरोधात रीतसर तक्रार दिली. आपल्याला दमदाटी करण्यात आली, मागासवर्गीय डॉक्टर माजले आहेत, असे म्हणत शौचालय साफ करायला लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपली बदनामी करण्यात आली. याचा आपल्या कुटुंबावर तसेच आपल्यावर मानसिक परिणाम झाला आहे. या घटनेने आपला रक्तदाब वाढला, असे डॉ. वाकोडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
View this post on Instagram
अधिष्ठाता डॉ.एस.आर. वाकोडे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम 353, 506, 500, 34 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3 (1) (एस), 3/1 (एम) 3/3 (1) यू आणि व्हीए तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा सुविधा (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 च्या कलम 4 नुसार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार पाटलांच्या विरोधात डॉक्टरांचा मोर्चा
चमकोगिरी करण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय स्वच्छ करायला लावणारे गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात डॉक्टर, आरोग्य कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खासदार पाटलांच्या दंडेलीविरोधात रुग्णालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, मार्डही या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकर्यांनी खासदार हेमंत पाटलांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चेकर्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन खासदार पाटलांना अटक करण्याची मागणी केली.



























































