बोरिवलीतील आगीत दोघांचा मृत्यू; तीन गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली येथील वीणा संतूर इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर, मंतनपाडा परिसरातील विणा संतूर या आठ मजली इमारतीला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणात चौथ्या मजल्यापर्यंत पसरल्याने येथील काही रहिवाशी अडकून पडले होते. यामध्ये गंभीररीत्या भाजल्याने ग्लोरी वालफाटी (43) व जोसू जेम्स रॉबर्ट (8) या दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक महिला 100 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. आगीच्या घटनेची चौकशी पोलीस, अग्निशमन दलाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मृतांची नावे-

ग्लोरी वालफाटी (43), जोसू जेम्स रॉबर्ट (8)

जखमींची नावे-

1) लक्ष्मी बुरा (40)  50 टक्के भाजून जखमी,

2) राजेश्वरी भरतरे (24) 100 टक्के भाजून जखमी,

3) रंजन सुबोध शहा (76) 45-50 टक्के भाजून जखमी