
>> मिलिंद देखणे
जुन्या पिढीतील सामाजिक बांधीलकी जपणाऱया मोजक्या नेत्यांमध्ये बबनराव ढाकणे यांचा समावेश होतो. व्यक्तिगत आयुष्यात बबनराव ढाकणे अत्यंत कष्टाळू जीवन जगले. ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न त्यांनी वेळोवेळी लावून धरला. सत्तेच्या व उभारलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार दिला. नगर जिह्यामध्ये राजकारणामध्ये मोठा दबदबा त्यांनी निर्माण केलेला होता. बबनरावांचे वडील दादाबा व आई ममताबाई दोघेही अक्षर ओळख नसणारे, परंतु उपजत व्यवहार चातुर्य त्यांच्या अंगी होते. प्रामुख्याने वंजारी, धनगर, गोसावी, मुस्लिम समाजाची वस्ती असलेल्या अकोले गावी दादाबा ढाकणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वकर्तृत्वाने आपले नाव मोठे केले. अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी-विक्री संघाचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. बबनरावांना एकूण आठ भावंडे. यात चार बहिणी आणि चार भाऊ. भावांमध्ये बबनराव सर्वात थोरले. नगर जिह्याच्या अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. राज्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी वीस वर्षे विधिमंडळामध्ये काम केले तर एकदा त्यांना खासदार होण्याची संधी मिळाली. बीड मतदारसंघातून ते खासदार झाले. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली. नगर जिह्यातील पाथर्डी या ठिकाणी त्यांनी विधानसभेत निवडून येऊन तालुक्याचा विकास कशा पद्धतीने होईल याकडे सातत्याने लक्ष दिले. विशेष म्हणजे नगर जिल्हा हा सहकार क्रांतीचा जिल्हा म्हणून पाहिले जायचे. डाव्या विचारसरणीचा हा जिल्हा व या जिह्यामध्ये सहकार चळवळ रुजवली गेली पाहिजे ही महत्त्वाकांक्षा बबनराव ढाकणे यांनी मनाशी बाळगून सहकाराचे जाळे विणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर सहकार चळवळीमध्ये जो ऊस तोडणी मजूर आहे, त्या मजुराचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1970 मध्ये राज्यामध्ये ऊस तोडणी कामगारांचा संप बबनरावांनीच घडवून आणला होता. मागण्या मान्य झाल्यानंतरच हा संप मागे घेण्यात आला. नगर जिह्यामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलासुद्धा पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी आठमय पाणी कशा पद्धतीने देता येईल याकरिता त्यांनी चळवळ उभारली. प्रशासनाच्या समवेत बैठका घेऊन त्यांनी मुळा धरणातून पाणी कशा पद्धतीने देण्यात येईल असे नियोजन केले व ते आजही तशाच पद्धतीने सुरू आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्येसुद्धा त्यांचा मोठय़ा प्रमाणामध्ये सहभाग होता. गोवा मुक्ती संग्रामात सहभाग नोंदवला. ग्रामीण भागामधून आल्यामुळे त्यांना नगर पंचायतीपासून ते जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्या वेळेला ते केंद्रामध्ये होते त्या वेळेला त्यांनी रेल्वे प्रश्नाबरोबरच केंद्रातल्या ज्या ज्या काही योजना आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर मजुरांचे प्रश्न, राज्यातील शिक्षणाचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी हाताळले. गिरणी कामगारांचे पुनर्वसन व्हावे यासाठीसुद्धा त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुलोद सरकारला बबनराव ढाकणे यांनी साथ दिली होती. सहकारचे जाळे त्यांनी त्या ठिकाणी विणले. केदारेश्वर कारखान्याची त्यांनी निर्मिती केली व त्यातून हजारो लोकांचा प्रपंच त्यांनी उभा केला. बबनराव ढाकणे यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक लढवय्या राजकीय नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

























































