ध्यास वजन कमी करण्याचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

वजन कमी करण्यासाठी लोक शॉर्टकट्स आणि झटपट परिमाण देणाऱया प्रोग्रॅमकडे आकर्षित होतात. सर्वप्रथम ‘लॉस’ हा नकारात्मक शब्द काढून आपण ‘हेल्थ गेन’ हा सकारात्मक शब्द मनात रुजवला तर वजन कमी करताना येणारा मनावरचा ताण कमी होऊन जातो.

वजन कमी करण्याचा सगळीकडे एवढा गाजावाजा आणि मार्केटिंग जगात चालू असते. त्यासाठी विविध मार्ग, महागडी पावडर आणि सर्जरी या अनेक गोष्टी इतक्या प्रमाणात चालू राहतात. याची दोन कारणे आहेत. 1) मानसिक इच्छा आणि बळ कमी पडणे. 2) आपण जे काही करतोय त्यात म्हणावे तसे सातत्य नसून धरसोड असणे.

एक वाक्य कायम लक्षात ठेवायचे आणि ते म्हणजे ‘डाएट इज 80 पर्सेंट माइंड गेम’ या सर्व प्रक्रियेत सातत्य राहण्यासाठी प्रेरणा किंवा मोटिव्हेशनची गरज असते. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला नाही तर ती गोष्ट पूर्णत्वास नेणे अवघड होऊन जाते. वाढदिवस, सण, वीकएंड्स हा आजच्या जीवनशैलीचा एक मोठा भाग आहे. वेट लॉस मोटिव्हेशन कसे कायम ठेवावे हा एक महत्त्वाचा विषय आहे.

आजूबाजूला सकारात्मक वातावरण ः

आजूबाजूला सकारात्मक आणि पोषक वातावरण असायला हवे. तुमच्या संगतीत जर आरोग्याबाबत जागरूक लोक असतील तर नक्कीच तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला पूरक वातावरण तयार होते. एवढेच नव्हे तर घरात ताजी फळे आणि भाज्या असल्या की, आपल्या कार्यसिद्धीसाठी पूरक वातावरण आपोआपच तयार होईल.

आपले जुने बारीक फोटो लावून ठेवले तरी खूप फरक पडतो.

दररोज वजन करू नका ः दररोज वजन करू नका. कारण त्यामुळे खूप फरक न दिसल्यास ताण वाढतो आणि त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन वाढून वजन कमी न होता वाढूसुद्धा शकते. म्हणून आपले वजन आठवडय़ातून एकदा आणि त्याहून चांगले म्हणजे 15 दिवसांतून एकदाच करावे.

तज्ञांची मदत घ्या ः सर्वात महत्त्वाचे म्हणजे तज्ञांची मदत घ्या. जेणेकरून आपण योग्य मार्गावरून जात आहे की नाही ते आपल्याला कळते. नीट रस्ता सापडेल.

काही टिप्स याप्रमाणे

इथे शर्यत नाही ः आपण नेहमीच वजन कमी करणे यासाठी किती किलो आणि किती वेळेत यावर विचार करतोच करतो. 1 महिन्यात 7 किलो, दिवाळीपर्यंत 10 किलो, प्री- वेड शूट आहे, त्याआधी करायचे आहे, माझे किंवा मैत्रिणीचे लग्न आहे, त्यासाठी वजन कमी करायचे आहे अशी वेगवेगळी कारणे लोकांकडे असू शकतात. कधी कधी हे असे मोटिव्हेशन जादूसारखे काम करते.

रेकॉर्ड ठेवा ः आपल्याला काही गोष्टींवर काम करावे लागते आणि एक तुलनात्मक नोंद ठेवणे गरजेचे असते. जसे की, कोणी क्लिनिकवर आले की, आम्ही मशीनवर बॉडी फॅट्स, बीएमआय चेक करतो. छाती, पोटाचा वरचा भाग, पोट, कंबर, दंड, मांडी यांची मापे घेऊन त्यांची नोंद एका वहीत तारखेनिशी करून ठेवावी. तसेच वजनाचा काटा घरी असावा.

कधीतरी ब्रेक घ्या ः सतत आपण वेट लॉसच्या मागे लागलो आणि त्याचासुद्धा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी दोन दिवसांचा सरळ ब्रेक घ्यावा आणि खाणे, पिणे, व्यायाम यांचा दोन दिवस फार जास्त विचार करू नये.

यश साजरे करा ः एखादे छोटेसे यश मिळाले तर स्वतःलाच काहीतरी गिफ्ट द्या. मात्र ते गिफ्ट खाण्यापिण्याचे नको तर एखादा छान ड्रेस किंवा वस्तू किंवा एक छान स्पा असे काही करायला हरकत नाही. म्हणजे आपले मोटिव्हेशन कायम राहायला मदत होते.

जुन्याकडे वळा ः जुने चांगले कपडे परत घालायला मिळणे हा खूप लोकांसाठी प्रचंड मोटिव्हेशन देणारा भाग आहे. त्यामुळे आपले आवडीचे कपडे परत घालायला मिळाले की, एक वेगळाच आनंद तर मिळतोच.