
देवगड तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी 26 मतदान केंद्रावर मतदान झाले असून एकूण 8051 मतदार आहेत त्यापैकी 5650 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला .यात पुरुष मतदार 2984व महिला मतदार 2666 यांनी मतदान केले. सरासरी 70.17% एवढे मतदान झाले. सकाळी 7.30 ते 9.30 व 9.30 ते 11.30 या दोन टप्प्यात पुरुष मतदार 1689 आणि स्त्री मतदार 1398 एकूण 3087 मतदारांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 38.343% एवढी झाली. मतमोजणी सोमवारी देवगड तहसिल कार्यालयामध्ये होणार आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट, रामेश्वर, विठ्ठलादेवी, वानिवडे, वळिवंडे, ठाकूरवाडी, शिरवली, पावणाई, फणसगाव या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले.या निवडणुकीमध्ये एक सरपंच व 26 सदस्य बिनविरोध निवडुन आले असल्याने 8 सरपंचपदासाठी 18 उमेदवार तर 41 सदस्यपदांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत.
त्याचबरोबर तालुक्यातील इळये, गोवळ, कुवळे, हडपीड, मणचे, आरे, गवाणे, सांडवे, ओंबळ, पेंढरी, मळेगाव, विजयदूर्ग या बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही 5 नोव्हेंबर रोजी पार पडली. मात्र इळये व गोवळ या दोन ग्रामपंचायतींच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. या दोन्हीही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. इतर 10 ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल न झाल्याने सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये विजयदुर्ग ग्रा.पं.चे सरपंचपदही रिक्त राहिले. तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान पार पडले .सोमवारी देवगड तहसीलदार कार्यालयात स.10 वाजलेपासून मतमोजणी ला सुरुवात होणार आहे.






























































