
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणाऱया तुरुंगाचे पहाटेच्या सुमारास हेक्सा ब्लेडने गज कापून खून, बलात्कारासारख्या गंभीर गुह्यातील चार कैद्यांनी पलायन केले. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांचा बंदोबस्त आणि कारभाराचे ‘दिवाळे’ निघाले आहे.
खून प्रकरणातील आरोपी राहुल देवीदास काळे, खुनाचा प्रयत्न गुह्यातील मच्छिंद्र मनाजी जाधव, बलात्कार प्रकरणातील अनिल छबू ढोले व रमेश रोशन दधेल (थापा) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.
पळालेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. या चौघांनी हेक्सा ब्लेडचा वापर करून तीन नंबरच्या तुरुंग खोलीचे गज कापले आणि धूम ठोकली. पळालेल्या कैद्यांना नेण्यासाठी शहर पोलीस स्टेशनबाहेर एक मोटार उभी होती. त्यात बसून चौघेही पसार झाले.
संगमनेरच्या कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी आहे. कोपरगावच्या तुरुंगातील आरोपी येथे शिफ्ट केल्याने कैद्यांची संख्या वाढली आहे. रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. तरीही कैद्यांनी तुरुंगाचे गज कापून पहाटेच्या सुमारास तुरुंगातून पलायन केले.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱया या तुरुंगाबाबत नेहमीच विविध घटना जनतेसमोर येत होत्या. तुरुंगातील कैद्यांवर कुठलाही अंकुश पोलिसांकडून नसल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. यामध्ये आरोपींनी अगदी वाढदिवस साजरा करणे, दादागिरी करणे, नवीन आलेल्या आरोपींना मारहाण करणे, तसेच सर्व सोयीसुविधा चहा, बिडी, सिगारेट, मोबाईल मिळवणे असे प्रकार घडत होते. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांतून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या होत्या. त्यामुळे तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी असल्याचेच दिसून येत होते. आजच्या पलायन घटनेमुळे पोलीस, जेलर व तुरुंग अधीक्षकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
तहसीलदार हे तुरुंगाचे अधीक्षक असतात. तसेच शहर पोलीस ठाण्यातून व उपविभागातील इतर पोलीस ठाण्यांकडून येथे बंदोबस्तासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते. आज आरोपींनी तुरुंग तोडून पलायन करण्याची घटना पोलीस अधिकारी, सुरक्षा आणि तुरुंग अधीक्षक यांच्या निष्काळजीपणाचा नमुना ठरला आहे. यापूर्वीही आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.



























































