
पाऊस न्यूझीलंडच्या पाचवीला पुजलेला आहे. सलग चार सामने जिंकून टॉपवर राहिलेल्या न्यूझीलंडचे ग्रह फिरले आहेत. गेल्या आठवडय़ात 401 धावा करूनही न्यूझीलंडचा पावसामुळे पराभव झाला. त्यामुळे कोमात असलेल्या पाकिस्तानच्या जिवात जीव आला होता. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱया अखेरच्या साखळी लढतीवरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे त्यांचे उपांत्य फेरीतील आव्हान संकटात सापडले आहे.
न्यूझीलंडचा संघ स्पर्धेच्या प्रारंभी सर्वात जोरदार खेळ करत होता. मात्र धर्मशाळेत हिंदुस्थानविरुद्ध हरल्यापासून त्यांच्या खेळाला दृष्टच लागली आहे. हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना अवघ्या 5 धावांची हार सहन करावी लागली होती. हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागला. त्याचे परिणाम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दिसले. आफ्रिकेच्या 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा संघ 167 धावांतच आटोपला. या पराभवाने ते आणखीनच खचले. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्यांनी कमबॅक करत 401 धावांचा डोंगर उभारला. पण हा डोंगर चढण्यासाठी पाकिस्तानला संघर्ष करावा लागला नाही. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि डकवर्थ-लुईस पाकिस्तानवर मेहेरबान झाली. परिणामतः पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान पुन्हा जिवंत झाले.
या पराभवामुळे आधीच न्यूझीलंड संकटात होताच आणि आता पुन्हा एकदा चिन्नास्वामीवर पावसाचे ढग दाटल्यामुळे किवींचे पंठ दाटून आले आहेत. जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल केला जाईल. जो न्यूझीलंडसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. कारण उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडला मोठय़ा विजयाची संधी असताना पावसाने खोळंबा घातला तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचे संकट ओढावले जाऊ शकते.
हेड टू हेड
न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या 44 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 101 लढती झाल्या आहेत. यात न्यूझीलंडने 51, तर श्रीलंकेने 41 लढती जिंकल्या आहेत. आठ लढतींचा निकाल लागलेला नाहीये, तर एक लढत टाय झालेली आहे. मात्र, वर्ल्ड कपच्या इतिहासात श्रीलंकेचे पारडे न्यूझीलंडपेक्षा सरस आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च स्पर्धेत श्रीलंका संघ 6-5 असा आघाडीवर आहे. मात्र उद्या न्यूझीलंडला विजयासह या समीकरणात बरोबरी करण्याची संधी असेल.
धावांचा पाऊस की पावसाचा फटका?
बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. पाटा खेळपट्टीमुळे चेंडू सहज बॅटवर येतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ साडेतीनशे धावा करण्याचा प्रयत्न करेल. एवढेच नव्हे, तर चेस करतानाही या खेळपट्टीवर धावांचा सहज पाठलाग करता येतो. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र ढगाळ वातावरणामुळे लढतीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा मोठा व्यत्यय आला तर न्यूझीलंडचे पॅकअप होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पाऊस पडू नये यासाठी प्रार्थना करत असतील, तर पाकिस्तान व अफगाणिस्तानचे खेळाडू न्यूझीलंड-श्रीलंका लढत पावसाच्या पाण्यात वाहून जाण्यासाठी अल्लाकडे दुवा मागत असतील.
चौथा नंबर कुणाचा ?
हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तिघे उपांत्य फेरीत पोहोचलेत. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तिघांनाही समान संधी आहे. त्यात न्यूझीलंड सर्वात पुढे असला तरी त्यांचे भवितव्य पावसाच्या हाती आहे. पावसामुळे सामना भिजून गेला तर चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी संधी पाकिस्तानला असेल. कारण पाकिस्तानची अखेरची लढत इंग्लंविरुद्ध होणार आहे आणि त्यांना फक्त विजय मिळवणे गरजेचे असेल. तसेच अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेशी भिडणार असल्यामुळे त्यांच्यासाठी विजयाचे दोन गुण मिळवणे निश्चितच सोप्पे नसेल. पण बंगळुरूला पाऊस पडला तर पाकिस्तानच्या मदतीला पुन्हा एकदा पाऊस धावून आल्याचे दिसून येईल. त्यामुळे चिन्नास्वामीवर पाऊस धावांचा पडतोय की पाण्याचा त्यावर चौथ्या क्रमांकाचे सारे गणित अवलंबून असेल.






























































