
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे. यामध्ये 6 आरोपींसह टेम्पो आणि आलिशान मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यावेळी चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींना आज राहुरी न्यायालयात हजर केले असता, त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवळाली प्रवरा येथील अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्रातून, तर तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून 80 हजार 500 रुपये किमतीचा कापूस चोरी झाल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासांत 6 आरोपींसह एक टेम्पो आणि आलिशान मोटार जप्त केली आहे.
सराईत गुन्हेगार करण माळी याने कापूस चोरी करण्यासाठी टोळी बनवली होती. या टोळीमध्ये पप्पू गुलाब बर्डे, ऋषिकेश मधुकर लोखंडे (वय 21), प्रज्वल सूर्यभान झावरे (वय 20), प्रज्वल अशोक भांड (वय 19), विनित संजय कोकाटे (वय 18), अक्षय नारद, बन्नी बर्डे, प्रतीक बाळासाहेब बर्डे (वय 21), सचिन रमेश बर्डे ऊर्फ टीचकुले (वय 21) अशा दहाजणांची टोळी तयार केली होती. या टोळीने तालुक्यात कापूसचोरीचा धडाका लावला होता. यातील सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यातील करण माळी व पप्पू बर्डे यांच्यासह अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज गायकवाड, राहुल यादव, नदीम शेख, सम्राट गायकवाड यांनी ही कामगिरी केली.























































