सत्याचा शोध – महिला पुरोहित? शांतम पापम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

अंधश्रद्धेत पहिला बळी जातो तो समाजातील दुर्बल घटकांचा आणि त्यातही अग्राम लागतो तो स्त्रीचा. यामुळेच महिलांना पुजारी म्हणून काम देऊ नये असा फतवा काढला जातो. अजूनही स्त्रीचा मासिक धर्म, मंत्रांमुळे होणारा परिणाम याबाबत धर्ममार्तंड, सनातनी लोक अंधश्रद्धेवर पाणी सोडायला तयार नाहीत.

बऱयाच दिवसांची रद्दी साठली होती. विकण्यासाठी ती सगळी गोळा करीत असताना रद्दीतल्या एका दैनिकातील लेखाकडे लक्ष गेले. संपादकीय पानावरील त्या लेखात मधोमध एक चौकट ठळक अक्षरांत छापली होती. त्या चौकटीतला लक्षवेधी मजकूर होता, ‘महिलांना मंदिरात, देवळात अजिबात पुजारी म्हणून काम देऊ नये आणि महिलांनीही मंदिरात पुजारी म्हणून काम करू नये. कारण स्त्रियांची जननेंद्रिये ओटीपोटात असतात. देवाची पूजा करताना मंत्र म्हणावेच लागतात. त्या मंत्राचा वाईट परिणाम त्यांच्या ओटीपोटातल्या जननेंद्रियावर होऊ शकतो.’ वरील विचार मुक्ताफळे म्हणून एखाद्या उथळ चर्चेत अथवा खासगी गप्पांत कोणी उधळली असती तर हसून सोडून देण्यासारखे होते, पण इथे तर चक्क एका वृत्तपत्रात तसे छापले होते. हे वृत्तपत्र म्हणजे दक्षिणेतील एक सनातनी विचारांची बांधिलकी जपणारे साप्ताहिक होते. इतर पानांवरही धर्मातील जुन्या चालीरीती, कर्मकांडे, इतकेच नाही तर ग्रहकोप व शांती, पितृदोष, अतिंद्रिय शक्ती इत्यादी छापून एकूणच अंधश्रद्धांची पाठराखण केलेली दिसत होती. काही ठिकाणी तर विज्ञानाचा पाणउतारा करून अध्यात्माची पालखी उचललेली दिसत होती. हिंदू धर्मातील अंधश्रद्धेचा प्रचार करण्यासाठीच हे साप्ताहिक जन्माला आले होते हे उघड उघड दिसत होते. खेदाची गोष्ट अशी की, हिंदुत्वाच्या आड दैववादाचा पुरस्कार करणारे हे विषपत्र तब्बल अठरा भाषेत प्रसिद्ध होत असल्याचे गौरवाने छापले होते.

अंधश्रद्धेचा एकदा खाटीकखाना थाटला की, पहिला बळी जातो तो समाजातील दुर्बल घटकांचा आणि त्यातही अग्राम लागतो तो स्त्रीचा. हे असले खाटीकखाने केवळ आपल्यासारख्या मागासलेल्या देशातच होते असे नाही, तर तो एक ळहग्नेत् झ्पहदसहदह होता. कारण इंग्लंडसारख्या प्रगत देशातही ‘करणी’ करते असा आरोप ठेवून अगणित स्त्रियांना चेटकीण ठरवून ठार मारण्यात आले. आपल्या देशातही पती निधनानंतर पत्नी पतीच्या चितेवर जाळून सती जात होती. पतीला मोक्ष, स्वर्ग वगैरे मिळणार नाही म्हणून स्त्रियांना आपण जाळत होतोच की. या सगळ्याच्या तुलनेत स्त्रीला पुजारी म्हणून मान्यता न देणे ही तशी किरकोळच बाब समजली पाहिजे, पण प्रश्न असा उभा राहतो की, कुठल्या धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन ही आडकाठी केली जाते? त्या ग्रंथाचा कुठेही नामोल्लेख नव्हता. एरवी हजारो वर्षांपूर्वीच्या कालबाह्य झालेल्या धर्मग्रंथांची साक्ष काढण्याचा आटापिटा हे धर्ममार्तंड करीत असतात. परंतु कुठेच काही न सापडल्याने कारण काय सांगतात, तर स्त्रियांचे जननेंद्रिय ओटीपोटात असल्याने पूजेप्रसंगी म्हटल्या जाणाऱया मंत्रांचा त्यावर अनिष्ट परिणाम होतो.

शेकडो वर्षे आम्ही हिंदुस्थानींनी माणसाला होणाऱया आजारावर औषधी उपाय अथवा वैद्यकीय संशोधनाचा ध्यास धरण्याऐवजी अलीकडच्या चारोळीचे सगेसोयरे शोभतील असे ‘मंत्र’ नामक निष्फळ अन् हास्यास्पद प्रकार रचण्यात आमची बुद्धी खर्च केली. ज्ञात असलेल्या आजारावर तर आम्ही मंत्र रचलेच, पण एखाद्याने अमर व्हावे म्हणून ‘मृत्युंजय मंत्र’ही म्हटल्या जाणाऱयांच्या नाकाशी धरला. ‘गायत्री मंत्र’ म्हटल्याने म्हणे बुद्धी प्राप्त होते म्हणून अलीकडे त्याचे शाळेत पठण करावे असा आटापिटा काही धर्मप्रेमी मंडळी करताहेत.

थोडक्यात, कुठलाही मंत्र कितीही भक्तिभावाने म्हटला तरी ना कसला परिणाम होत ना कसला दुष्परिणाम. तेव्हा पूजेच्या समयी स्त्रियांनी मंत्र म्हटले तर त्यांच्या देहावर कुठलाही अनिष्ट परिणाम होणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. मंत्राचा जो काही परिणाम होणार असेल तर तो पुरुषांच्या जननेंद्रियावर व्हायला हवा. कारण ती बाह्यांगी म्हणजे शरीराच्या बाहेर असतात. परिणामी स्त्रियांच्या तुलनेत कसलाही धोका संभवणार असेलच तर तो पुरुषांना अधिक संभवतो, पण स्त्रियांकडे बघण्याची जगातल्या सर्वच धर्मियांची दृष्टी दूषितच आहे.

आमची धारणा तर ‘स्त्री ही मुक्तीच्या मार्गातील धोंड’, ‘नरकाचे द्वार’ अशाच मनोवृत्तीची. खरं तर मंत्रामुळे स्त्रियांवर दुष्परिणाम होतील हा धर्ममार्तंडांचा निव्वळ बहाणा आहे. खरे कारण स्त्रियांचा मासिक धर्म हेच आहे. अजूनही सनातनी लोक यासंदर्भातल्या अंधश्रद्धेवर पाणी सोडायला तयार नाहीत. याच साप्ताहिकाने काही वर्षांपूर्वी बिनदिक्कतपणे छापले होते की, ‘मासिक पाळीच्या त्या चार दिवसांत स्त्रीचे संपूर्ण शरीर विषारी झालेले असते. स्त्री जिथे झोपते तिथे विषाणूंची रास पडते.’ पुढे पुस्तीही जोडली होती की, अशा प्रकारचे संशोधन अमेरिकेत एका विद्यापीठात झाले आहे आणि त्या विद्यापीठाचे नावही नमूद केले होते. प्रत्यक्षात अशी युनिव्हर्सिटीच अस्तित्वात नसल्याचे समजले.

मुंबईतील विलेपार्ले या उपनगरात अनेक सुविद्य महिला स्त्री-पुरोहिताचे काम करतात हे मला माहीत होते. त्यांच्यापैकी काही जणी नित्यनियमाने पार्ल्याच्या आचार्य अत्रे कट्ट्यावर येणाऱया असल्याने माझ्या चांगल्याच परिचयाच्या होत्या. त्यांना यासंदर्भात विचारल्यावर त्या स्पष्टपणे म्हणाल्या की, गेली कित्येक वर्षे आम्ही हा पुरोहिताचा व्यवसाय करतोय. पूजेच्या प्रसंगी संयुक्तिक सगळे मंत्र म्हणत आलो आहोत, पण आमच्यापैकी कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही.

हे रामायण-महाभारत काही वर्षांपूर्वीच घडून गेलेले आहे. निमित्त होते पंढरपूरच्या देवस्थान समितीने केलेला ठराव. त्या ठरावात असे स्पष्ट म्हटले होते की, यापुढे महिलांचीही पुजारी म्हणून नेमणूक केली जाईल. पंढरपूरला विठोबाची पूजा बडवे करतात, तर रुक्मिणीची पूजा उत्पात करतात. तेव्हा निदान रुक्मिणीची पूजा स्त्रियांनी करावी असे त्या धर्ममार्तंडांनी म्हणावयास हवे होते, पण एकदा धर्माचे जोखड मानेवर घेतले की, धर्म अंगात भिनतो आणि मेंदूला कोमात पाठवतो हेच खरे.

त्यातून दोन पातळीवर जगणे हे आम्हा हिंदुस्थानींच्या जीवनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी’ असा उद्घोष आम्ही अधूनमधून करीत असतो. इतकेच काय पण स्त्रीची आदिशक्ती म्हणून पूजाही करतो, पण त्याचबरोबर पायातली चप्पल पायातच राहिली पाहिजे असा इशारा देत तिचे स्त्रीत्व पायदळीही तुडवतो. हे दुटप्पीपण ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी आपल्या सर्वांसाठी खऱया आनंदाची पहाट झालेली असेल.

 [email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)