
बॉलीवूडमधील एका सिनेनिर्मात्याच्या घरी चोरी करणाऱया नोकराला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. राम सुभाष यादव असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे सिनेनिर्माते असून ते अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात राहतात. लोखंडवाला येथील घराची साफसफाई करण्यासाठी त्यांनी एक नोकर ठेवला होता. त्या घरातील कपाटात ते सोन्या-चांदीच्या वस्तू ठेवत असायचे. मे महिन्यात ते लोखंडवाला येथील घरात असताना त्यांनी महागडी घडय़ाळे, चांदीच्या आणि मौल्यवान वस्तू त्या कपाटात ठेवल्या होत्या. गेल्या आठवडय़ात त्यांनी पत्नीला कपाटातील बॅग घेऊन येण्यास सांगितले तेव्हा त्यांना ती बॅग हलकी वाटली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांच्या पत्नीने ती बॅग उघडली तेव्हा त्या बॅगेत सोन्या-चांदीच्या वस्तू आणि महागडी घडय़ाळे नव्हती. चोरीप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सिनेनिर्मात्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना यादवची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यादवला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने पत्नीच्या मदतीने ते सोने एकाला विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे.























































