
>>हर्षवर्धन दातार
काळानुसार आणि त्यातील बदलानुसार मागील आणि पुढील पिढीतील आवडीनिवडी, मूल्यं, निकष या सर्वात अंतर आले असले तरी ते स्वीकारून कमी करण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. आपले कान आणि संगीताची आवड ही ‘म्युझिकली ट्युन्ड’ (जुळलेली) असेल तर संगीत कुठल्याही वेळेचे असो, त्याचे आपण रसग्रहण करू शकतो. यासाठी गरज आहे ती आपण श्रवणीय संगीत ओळखण्याची, आपली आवड निर्माण करण्याची, जोपासण्याची, विकसित करून ती वृद्धिंगत करण्याची.
आदीपासून अंतापर्यंत जर एकमेव स्थिरांक असेल तर तो म्हणजे कायम होत गेलेला बदल (change is the only constant). आर्थिक, सामाजिक, तांत्रिक प्रगतीमुळे राहणीमानाचा दर्जा सुधारला आहे. माप (आणि मान) दंड, आदर्श, निकष, घटक, मूल्यं बदलत गेली आणि त्याअनुषंगाने पुढच्या पिढीची अभिरुची बदलत गेली. प्रत्येक पिढीला पूर्वीच्या पिढीकडून हे एक ब्रीदवाक्य ऐकायला मिळते, “आमच्या वेळेला हे असं नव्हतं” किंवा “आमच्या वेळेला सगळं कसं छान होत!” संगीताच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवते. “आमच्या वेळी संगीतप्रधान चित्रपट गाजत. शास्त्रीय बैठकीची, उडत्या चालीची, भक्ती संगीत, कुठल्याही प्रकारची गाणी आजसुद्धा आठवतात, मनात रुंजी घालतात. आजचं संगीत, गाणी ऐकल्याबरोबर आपण पुढच्या क्षणाला विसरतो” ही ठरावीक वाक्यं आपण ऐकतो. खरंच, आजचं संगीत इतकं टाकाऊ, गल्लाभरू आहे का? याची कारणमीमांसा करताना सर्वात मुख्य कारण समोर येतं, काळ बदलला आहे.
सत्तरच्या दशकापर्यंत ’रेडिओ’ हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं. घराघरात आकाशवाणी, विविध भारतीशी, रेडिओ सिलोनशी ‘भुले बिसरे गीत’, ‘बिनाका गीतमाला’, ‘आपली आवड’, ‘संगीत सरिता’ या श्रुतिसंपन्न कार्पामांच्या माध्यमातून आपण अखंड जोडलेले होतो. सतत ऐकल्यामुळे गाणी कायमची लक्षात राहिली. संगीत आणि आठवणी हे एकमेकांचे पूरक होते. पूर्वीची गाणी, संगीत आपल्याला नेमक्या त्या ठिकाणची, व्यक्तीची, प्रसंगाची आठवण करून देणारी होती. 1960 पर्यंत चित्रपट संगीताचा सोनेरी काळ होता. प्रसंगाला साजेशी शब्दप्रधान गाणी, त्याला समर्पक संगीत अणि गायकी म्हणून सर्व तपशिलासह आठवणीत आहेत. सत्तरच्या दशकात गाण्यांच्या चाली या काही प्रमाणात वाद्यवृंदप्रधान होऊ लागल्या. रफी, लता, आशा, मन्ना डे, मुकेश किंवा त्यापूर्वीचे सैगल, पंकज मलिक, सुरैया हे गायक आणि अनिल बिस्वास, ओ. पी. नय्यर, रवी, चित्रगुप्त, हेमंत कुमार, बर्मन पिता-पुत्र, सलील चौधरी आणि त्यानंतरचे लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी आनंदजी हे संगीतकार या सर्वांची असंख्य गाणी, त्यामागची बैठक, घटना आजही आठवणारी पिढी आहे. त्यामागची तपस्या, साधना, प्रावीण्य मिळवण्याची जिद्द ही सर्वश्रुत आहे. संगीताच्या सोनेरी युगाबद्दल अनेक पुस्तके, शिवाय प्रसारमाध्यमांतून बरच लिहिलं गेलं आहे. त्यामानाने आजच्या संगीताबद्दल कितीसं साहित्य उपलब्ध आहे?
‘आयेगा आनेवाला’ ते ‘चौदहवी का चांद हो’ असेल किंवा ‘ओ हसीना जुल्फो वाली जाने जहाँ’ ते ‘मेरे सपनो कि रानी कब आयेगी तू’ असेल आणि पुढे ‘माय नेम इज अॅंथनी गोन्साल्विस’, अशी असंख्य गाणी आज कित्येक दशके ताजीतवानी वाटतात, लक्षात आहेत. अगदी आजच्या पिढीलासुद्धा… आणि म्हणूनच वाद्यवृंदांच्या कार्पामात भर असतो तो या जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांवर. पूर्वी एका गाण्याचा जन्म अनेक तासांच्या (कधी दिवसांच्या) अथक परिश्रमानंतर होत असे. आधी सराव, तालीम आणि त्यानंतर सलग आणि सर्व साथीदारांसह, संपूर्ण वाद्यवृंदाच्या ताफ्यासह ध्वनिमुद्रण होत असे. एकत्र सराव आणि ध्वनिमुद्रण केल्यामुळे सर्वांच्या ‘तारा’ एकमेकांशी जुळत आणि या प्रयत्नांतून निर्माण झाले अजरामर कालातीत संगीत. तांत्रिक प्रगतीमुळे आज अनेक ट्रक्स उपलब्ध असतात. एकाच कीबोर्डमधून अनेक वाद्यांचा आवाज निर्माण करणे शक्य आहे. शिवाय आंतरजालावर संगीताचे तयार तुकडे उपलब्ध आहेत. गायक आणि साथीदार आपल्या सोयीनुसार आपले भाग उरकून निघून जातात. आजच्या युगात निर्मिती मूल्यांचा दर्जा खूपच उंचावला आहे. साधनांची उपलब्धता आणि त्यांचा दर्जाही उच्च कोटीचा असून संगीताचा दर्जा मात्र पूर्वीसारखा नाही. अनेक जणांच्या मते आजच्या संगीतात प्राण आहे, पण आत्मा नाही.
असं आपल्याला वाटतं का, आपण आजच्या संगीताचा सखोल अभ्यास केला नाही, ते नीट ऐकले नाही? आजच गाणं म्हणजे अनेक वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या तुकड्यांचे ठिगळ लावलेला पोशाख. या बदलामुळे आजच्या संगीतात प्राण असला तरी आत्मा नाही असा समज झाला आहे. संगीतालासुद्धा संपादित आवड (acquired taste) मूल्य आहे, जी अविरत प्रयत्नांनंतर मिळते. कलाकारांमध्येसुद्धा (अपवाद वगळता) चिकाटीचा, जिद्दीचा, साधनेचा अभाव दिसतो. जग आता क्षणिक आनंद, समाधानाकडे (instant gratification) वळलेले जाणवते. दूरदर्शन आणि कालांतराने आंतरजाल, समाज माध्यम आणि मोबाइलने मनोरंजनाचे क्षेत्र विस्तारले आणि निकष अंतर्बाह्य बदलून टाकले. मुख्य म्हणजे पर्याय निर्माण झाले आणि त्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या मनोरंजनाशी, माध्यमाशी जोडले जाण्याचा कालावधी (attention spam) कमी, अरुंद आणि आकसत गेला. मग ते संगीत असो, दृक-श्राव्य माध्यम असो किंवा छापील माध्यम. या मुख्य कारणामुळे लोकांचा असा समज झाला आहे की, आजकालचं संगीत हे पूर्वीसारखं राहिलं नाही. त्यात मधुरता नाही, गोडवा नाही, लक्षवेधी काळ आणि स्मरणमूल्य (rाम्aत्त् न्aत्ल) नाही.
वाचन असो, एखादा खाद्यपदार्थ असो किंवा संगीत असो, त्याची आवड ही जोपासावी लागते. शेवटी संगीत कालचे असो, आजचे असो किंवा उद्याचे, त्याचे मुख्य घटक अर्थात सूर, सरगम, ताल आणि लय. तेच कालातीत आहेत. आजचे संगीतही तितकेच मधुर, गोड आहे. फक्त ते ऐकायची आणि आवड निर्माण करायची तयारी, सबुरी आणि चिकाटी पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा, सवयीचा, आवडीचा बदल हा स्वीकारणं सोपं नसतं. त्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात, वेळ द्यावा लागतो.
1980 अणि 1990च्या दशकातसुद्धा कही संगीतप्रधान चित्रपटांच्या यशामध्ये संगीताचा सिंहाचा वाटा होता. ‘लव स्टोरी’, ‘एक दुजे के लिये’, ‘सनम तेरी कसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘हिरो’, ‘सागर’, ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’ , ‘दिल’, ‘आशिकी’, ‘साजन’ हे संगीतप्रधान चित्रपट लोकप्रियतेच्या निकषावर खरे ठरले. ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वोही सिकंदर’ या चित्रपटांनी तर युवा संगीतकार आनंद-मिलिंद आणि जतीन -ललितना पुढे आणलं. वेगळी वाटचाल करणारे ‘उमराव जान’, ‘कामचोर’, ‘निकाह’, ‘मासूम’, ‘रजिया सुलतान’, ‘अर्थ’, ‘उत्सव’, ‘लेकिन’, ‘प्रहार’ या चित्रपटांचं संगीत चोखंदळ रसिकांच्या पसंतीला उतरलं. मात्र अलीकडे, विशेषत साल 2000 नंतर दीर्घकाळ लक्षात राहतील अशा गाण्यांची संख्या रोडावत चालली आहे. तरीही ’मेरे हमसफर’ (‘रेफ्युजी’, 2000), ’चलो तुमको लेकर’ (‘जिस्म’, 2003), ’जिया धडक धडक’ (‘कलयुग’, 2005), ’सवार लूं’ (‘लुटेरा’, 2013), ’फिर ले आया दिल’ (‘बर्फी’, 2012) अशी काही निवडक गाण्यांनी स्मरणमूल्याची तग धरली आहे.
काळानुसार आणि त्यातील बदलानुसार मागील आणि पुढील पिढीतील आवडीनिवडी, मूल्यं, निकष या सर्वात अंतर हे केव्हाही राहणार हे निर्विवाद सत्य आहे. मात्र ते स्वीकारून कमी करण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. आभासी असो किंवा प्रत्यक्ष, आजही असे मार्गदर्शक संगीत श्रवण मंच आहेत, जे निवडक, कुठल्याही चांगल्या संगीताचा प्रसार करण्यात निरंतर प्रयत्नशील आहेत. गरज आहे आपण सर्वानी (पिढीतील अंतर बाजूला ठेवून) अशा मंचाशी जोडले जाऊन श्रवणीय संगीत ओळखण्याची, आपली आवड निर्माण करण्याची, जोपासण्याची, विकसित करून ती वृद्धिंगत करण्याची. ‘जुने ते सोने आणि नवीन ते टाकाऊ’ या मनोवृत्तीतून बाहेर येण्याची. फक्त आपण आपल्या मनाचे चक्षू, कवाड उघडे ठेवले तर आजच्या संगीताबद्दलचे आपले नकारात्मक समज दूर होतील. आपले कान आणि संगीताची आवड ही ‘म्युझिकली ट्युन्ड’ (जुळलेली) असेल तर संगीत कुठल्याही वेळेचे असो, त्याचे आपण रसग्रहण करू शकतो.
– [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)





























































