
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत कुरार, दिंडोशी, आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, परिमंडळ 12 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त अशा सर्वांकडे तक्रारी करून ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली आहे, पण पोलिसांनाही ड्रग्ज विक्रेते भीक घालत नाहीत. ड्रग्जचे सेवन करणारे लोक जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास देतात. त्यांना पोलिसांची भीतीच राहिलेली नाही. याबद्दल झोन 12 किंवा मुंबई पोलिसांनी याबद्दल कठोर व्हायला पाहिजे. जर येथील पोलीस त्यावर नियंत्रण आणत नसतील तर त्यांना या विभागातून बदला, पण या भागातील नागरिकांना ड्रग्ज विक्रेते व सेवन करणाऱ्या लोकांपासून त्रासातून सोडवा. 24 तासांत ड्रग्ज विक्रेत्यावर कारवाई करा अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावर शासनाने गंभीर दखल घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.


























































