
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाला आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जालन्याकडे जात असताना बदनापुर येथे एका मराठा आंदोलकाने ‘फडणवीस, गो बॅक’च्या घोषणा देत त्यांना काळा झेंडा दाखवला.
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे आज उद्घाटन होते. जालना रेल्वे स्थानकावर होणार्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्यात कोणताही राडा नको म्हणून पोलिसांनी बरीच खबरदारी घेतली होती. मराठा आंदोलक काळे झेंडे दाखवणार असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी बुटेगावचे सरपंच दत्ता गवारे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले.
नियोजित कार्यक्रमानुसार देवेंद्र फडणवीस हे आमदार नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनामा सप्ताहाला भेट देऊन जालन्याकडे जात असताना बसस्थानक परिसरात मराठा आंदोलक विष्णू रावसाहेब घनघाव यांनी त्यांच्या ताफ्यास काळा झेंडा दाखवला आणि ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्याने घनघाव यांच्याकडील काळा कपडा ओढून घेतला आणि त्यांना बाजूला केले.

























































