गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय; उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण झाले. यावेळी बोलताना मोदींनी घराणेशाहीवर भाष्य केले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालती का? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी मोदींच्या विधानाबाबत विचारले. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी कल्याण मतदारसंघात जात असून त्यांच्यासोबत असणाऱ्या गद्दारांची घराणेशाही चालते का? त्याच्याबाबत पंतप्रधान बोलले नाहीत. म्हणजे, गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय, असा हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसानेच बोलले तर बरे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

राम मंदिर हा कारसेवकांचा गौरव आहे!

राम मंदिर निर्माणात कारसेवकांचे मोठे योगदान असून त्यांना विसरता येणार नाही. दुर्दैवाने अनेक कारसेवक आपल्यात नाहीत, पण सुदैवाने जे आपल्यात आहेत हा त्यांचा गौरव आहे. कारसेवकांनी धाडस केले नसते तर आजचं राम मंदिर झाले नसते. कारसेवक बाबरीच्या घुमटावर चढले नसते तर आज जे घुमटावर झेंडे लावणार आहेत ते चढूही शकले नसते. झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात? या प्रश्नाचे उत्तर आज झेंडे लावणाऱ्यांकडे नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काळाराम मंदिरातील आरतीसाठी शिवसेनेचे राष्ट्रपतींना आमंत्रण

शिवसेनेची घोषणा होती; पहले मंदिर, फिर सरकार!

तुम्ही अयोध्येला कधी जाणार असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर निर्माण झाले नव्हते त्यावेळीही कोणी न सांगता मी स्वत: दोन वेळा तिकडे गेलो होतो. राम मंदिराचा मुद्दा थंड बस्त्यात पडला होता, राम मंदिर होणार की नाही असे वाटत होते तेव्हा पहले मंदिर, फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी अयोध्येला नक्की जाणार!

शिवतीर्थीवरील दसरा मेळाव्यात बोलताना अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते आणि शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला गेलोही. शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर वर्षभरात कोर्टाने राम मंदिराच्या बाजुने निकाल दिला. राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही, ज्या ज्यावेळी माझ्या मनात येईल त्या त्यावेळी मी राम मंदिरात जाणार. प्रभू श्रीरामचंद्र सर्वांचे आहेत. त्याचेच एक प्रतिक म्हणून आम्ही काळाराम मंदिरात जात आहो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.