अबोलीचे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी कधी काही गोष्टी राहून जातात बोलायच्या… कधी कधी काही गोष्टी मनातल्या मनात बोलतो आपण आणि मनातल्या मनातच साठवून ठेवतो, जे आपल्याला दुसऱयाशी बोलायचं असतं. कुणाला तरी सांगून मन मोकळं करायचं असतं. प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. शब्द प्रत्येकाकडे असतात, पण ते मांडता येतीलच असं नाही. मी तर नेहमीच माझ्या मनातल्या भावना मला हव्या तशा आणि जशा सुचतील तशा मांडत असतो. शब्द तर असतातच सोबतीला माझ्या. म्हणून मी काही बोलू शकतो, पण मी किती दिवस बोलणार? हा प्रश्न पडतो. कधीतरी तूही बोलत जा, मनातलं गुज खोलत जा. शब्द तुझ्या अंगणी आहेतच की, माझ्या मनाच्या अंगणातून वेचून नेलेले. त्यांच्यावर तुझाच हक्क आहे. त्यांना तू कधीतरी मनातून बाहेर काढ आणि व्यक्त हो!

कारण दोन मनांचा संवाद तेव्हाच होतो, जेव्हा दोन्ही मन व्यक्त होतात. आपण बोलू लागलोय, पण आपल्यात मीच बोलतोय, तू फक्त ऐकत असतेस.

मान्य आहे मला, तुला ऐकायला आवडतात मी लिहिलेले शब्द, एखाद्या सुरंगी संध्याकाळी मी वाचलेली एखादी कविता… त्यानंतरची तुझ्या माझ्यातील शांततासुद्धा मन लावून ऐकायला आवडते तुला. म्हणून जन्मभर फक्त ऐकत राहणार आहेस की काय? चार गोष्टी ऐकल्या की, दोन गोष्टी व्यक्त कर. तेव्हा खऱया अर्थाने आपला संवाद सुरू होईल आणि तुझ्या मनाच्या जाणिवा कळतील. तुझ्या अंतरीच्या भावना कळतील, पण तुला त्याची गरज वाटत नसावी. यात चूक माझीच आहे. कारण तू काही सांगायच्या आत आजवर मी तुझ्या मनातील एकेक जागा व्यापून घेतली आहे आणि एकेक रिता कोपरा शोधून तुझ्या मनातील भावना, तुझ्या मूक संवेदना, तुझे अबोल शब्द, तुझ्या अंतरीच्या चाहुली, तुझ्या पापण्यांच्या काठावर असलेली स्वप्नं, सगळं काही ओळखून माझ्याच शब्दांतून, माझ्या कवितेतून तुलाच सांगत आलोय आजवर. त्यामुळे तू तुझ्यापासून दूर गेलीस की, स्वतःचा शोध घ्यायला माझ्या कविता वाचतेस, तुझी ओळख शोधत राहतेस. या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आपल्या संवादात असलेला तुझा अबोला. मला माहीत आहे, तुला अबोल राहून खूप काही बोलायला आवडतं आणि तू अबोल असलीस तरी मी नेहमी तुझ्या अबोल्यातून काहीतरी बोल शोधावे आणि मीच त्यांचा अर्थ समजून घ्यावा अशी तुझी इच्छा असते.

मी खूपदा असंच करत आलो आहे आजवर आणि तुझ्या अबोल मनातल्या गोष्टी मीच बोलत राहिलो. यापुढेही असंच करत राहीन. माझी काही हरकत नाहीये, पण कधी कधी माझ्या मनालासुद्धा वाटतं, आपण अबोल राहून पाहावं, तू माझ्या अबोल मनातील भाव शोधून त्याचा अर्थ समजून घ्यावा. कधीतरी काही गोष्टी मी तुला न सांगता तुला माझ्या अबोल भावना समजाव्यात आणि तू त्यावर व्यक्त व्हावं.

कधीतरी एखादी कविता तुलासुद्धा सुचावी… कधीतरी मी जितका तुझ्या मनाचा विचार करत असतो, तितकाच तू माझ्या मनाचा विचार करावा … माझ्या मनाचा तूसुद्धा कधीतरी थांग घ्यावा…. तुला जमेल असं वाटत नाही, पण प्रयत्न करून बघ. काही दिवस शांतपणे मनातल्या मनात ऐकत रहा माझ्या मनातले अबोलीचे बोल…

[email protected]