16 माहिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला तब्बल 16 महिन्यांनी अटक करण्यात गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले.

आदित्य मयूर जाधव (रा. दत्त मंदिरा समोर, कुंजीर वस्ती, मांजरी बु.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून मागील 16 महिन्यांपासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते मात्र तो सापडत नव्हता. अखेर गुन्हे शाखेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस हवालदार मनोज खरपुडे यांना माहिती मिळाली की, चार गुन्ह्यांत 16 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी आदित्य जाधव हा त्याच्या घरी आला आहे. यावरून पथकाने आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय खरपुडे, अमोल सरतापे, संदीप येळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.