ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये; चौकशीपूर्वी रोहित पवार यांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे. 24 जानेवारीला ईडी कार्यालयात रोहित पवारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या चौकशीआधी रोहित पवारांनी टिवट करत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ईडी कार्यालयात बुधवारी (दि. 24 जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसे सहकार्य केले तसेच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचे सुडाचे राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये, उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे रहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारे आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय! असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.