देवगडमध्ये वर्षाची बेगमी सुरू; मसाले बनवण्यासाठी लाल मिरचीला मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगडमध्ये वर्षभराच्या बेगमीचा मसाला करण्यासाठी घराघरात लगबग सुरू आहे. मिरची खरेदीसाठी देवगड मांजरेकर नाका येथे महिलांची झुंबड उडाली आहे.लाल भडक दर्जेदार मिरची अडीचशे ते तीनशे रुपये दराने मिळत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोकणात बहुतांश वर्षभरासाठी लागणारा मसाला उन्हाळ्यात केला जातो. परंतु उन्हाळ्यात या मिरच्यांचे दर गगनाला भिडत असल्याने आता थंडीतही मसाले करण्यात येत आहेत. त्यासाठी लाल मिरची घेण्यासाठी देवगडमध्ये गर्दी होत आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत यावेळी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे दर कमी झाले आहेत. संकेश्वरी मिरची 300 रुपये आणि लाल तिखट मिरची 250 रुपये किलोने चांगल्या दर्जाची मिरची मिळत आहे.